| सांगली समाचार वृत्त |
हैदराबाद - दि. २९ मे २०२४
महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत जाळे पसरलेल्या तेलंगणातील आंतरराज्यीय बालतस्कर टोळीचा भंडाफोड करण्यात हैदराबाद पोलिसांना यश आले. या कारवाईत टोळीतील ११ जणांना अटक करीत दिल्ली व पुण्यातील व्यक्तींकडून मिळालेल्या १३ बालकांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. अशाप्रकारे किमान ५० बालके निपुत्रिक दाम्पत्यांना पावणेदोन लाख ते साडेपाच लाख रुपयांमध्ये विकल्याची कबुलीही या तस्करांनी दिली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २२ मे रोजी कारवाई करीत बालतस्करांच्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला होता. त्या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली होतीं, अशी माहिती रचाकोंडाचे पोलीस आयुक्त तरुण जोशी यांनी दिली. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी २७ मे रोजी आणखी ८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सुटका केलेली १३ बालके या तस्करांना दिल्ली तसेच पुण्यातील तीन व्यक्तींकडून मिळाली होती. या तस्करांना जवळपास ५० बालके मिळाली होती. दलालांच्या मदतीने निपुत्रिक दाम्पत्यांना या बालकांची प्रत्येकी १.८० लाख रुपये ते साडेपाच लाख रुपयांत विक्री केल्याची कबुली या तस्करांनी चौकशीत दिली आहे.