yuva MAharashtra सांगली येथील 'लव्ह जिहाद'च्या विरोधातील मोर्चास पोलिसांनी अनुमती नाकारली !

सांगली येथील 'लव्ह जिहाद'च्या विरोधातील मोर्चास पोलिसांनी अनुमती नाकारली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ मे २०२४
येथे आज १९ मे या दिवशी 'लव्ह जिहाद'च्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यास अनुमती मिळण्यासाठी भाजपचे नेते नीलेश हिंगमिरे यांनी पोलीस ठाण्याकडे अनुमती मागितली होती; मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी ही अनुमती नाकारली. अनुमती नाकारल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. असे असले, तरीही १९ मे या दिवशी 'लव्ह जिहाद'च्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यात येईल, असे सकल हिंदु समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई येथील कु. पूनम क्षीरसागर आणि कर्नाटक येथील कु. नेहा हिरेमठ यांच्या क्रूर हत्यांचा जाहीर निषेध अन् एकूणच 'लव्ह जिहाद'च्या निषेधार्थ भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल हिंदु समाजाच्या वतीने १९ मे या दिवशी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे हेसुद्धा उपस्थित रहाणार आहेत.


हा मोर्चा १९ मेच्या सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होणार आहे. दीनानाथ चौक, मारुती चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशन चौक मार्गे जाऊन राममंदिर येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.

कु. नेहा हिरेमठ आणि कु. पूजा क्षीरसागर यांच्या हत्येचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण व्हावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालून गुन्हेगारांना लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, 'लव्ह जिहाद' थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा, सांगली येथे वक्फ बोर्डाने अवैधरित्या बळकावलेल्या भूमी महाराष्ट्र सरकारने परत घ्यावात, या तसेच अन्य मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येणार आहेत.
 
पोलिसांनी नीलेश हिंगमिरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा मोर्चा आणि सभा कोणत्या स्वरूपाची असेल ? त्याला किती गर्दी जमेल ? तसेच सभेचे वक्ते कोण असतील ? याची माहिती विचारली असता, त्यांनी याविषयी कोणतीही निश्‍चित माहिती दिलेली नाही. सांगली जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. या सभेच्या मूळ कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयाची माहिती अपुरी आणि त्रोटक असल्याने, तसेच कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने हा मोर्चा आणि सभेस सांगली शहर पोलिसांनी दिलेली अनुमती रहित करण्यात आली आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडेल, अशा स्वरूपाचे कृत्य केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सामाजिक माध्यमांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कुणीही कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.