yuva MAharashtra "देशात लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधून झाली; पंतप्रधान मोदींचे विधान चर्चेत !

"देशात लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधून झाली; पंतप्रधान मोदींचे विधान चर्चेत !



| सांगली समाचार वृत्त |
डेहराडून - दि. २९ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील दुमका येथे प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. झारखंड मधील नेत्यांकडून जो पैसा जप्त केला जातो आहे, तो पैसा त्यांनी विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून कमावला, असा आरोप त्यांनी केला. तसेच देशात लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधून झाली, असे ते म्हणाले.

दुमका येथे प्रचारसभेला बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना लक्ष्य केले. "झारखंड मधील काही राजकीय नेत्यांनी जमिनी हडपण्यासाठी स्वतःच्या आईवडिलांची नावे बदलली. त्यांनी भारतीय सैन्याची जागाही हडपली. अशा लोकांपासून आता झारखंडला मुक्त करण्याची वेळ आली आहे", अशी टीका पतप्रधान मोदी यांनी केली.


"४ जूननंतर या भ्रष्टाचाऱ्यां विरोधात कडक कारवाई"

पुढे बोलताना, झारखंड मुक्ती मोर्चाच्या लोकांनी जनतेच्या ताटातील अन्न चोरलं आहे. त्यांनी हर घर जल योजनेतही घोटाळा केला. असे घोटाळे करताना त्यांना थोडीही लाज वाटली नाही. मात्र, ४ जूननंतर या भ्रष्टाचाऱ्यां विरोधात कडक कारवाई केली जाईल", असा इशाराही त्यांनी दिला.

"काँग्रेसने आदिवासींचा इतिहास पुढे येऊ दिला नाही"

"झारखंडमधील आदिवासी समुदायासाठी भाजपाने मोठं काम केलं आहे. आम्ही आदिवासी कल्याणासाठी भरपूर निधी दिला. तसेच विविध योजना राबवल्या. मात्र, काँग्रेसकडून या योजनांना विरोध केला जातो आहे. काँग्रेसने आदिवासींचा इतिहास कधीची पुढे येऊ दिला नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीने प्रयत्न केले. या लोकांना आदिवासी समुदायाशी काहीही घेणं देणं नाही. या लोकांमुळेच आदिवासी संस्कृती धोक्यात आली", अशी टीकाही त्यांनी केली.

लव्ह जिहादची सुरुवातही झारखंडमधून

जोपर्यत काँग्रेस सत्तेत होती मोठ्या प्रमाणात नक्षलवाद वाढला. अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद झाले. अनेक आदिवासी परिवार उद्वस्त झाले. आज झारखंडमध्ये काही घुसखोर दाखल झाले आहेत. त्यामुळे झारखंडमधील आदिवासींची संख्या कमी होऊ लागली आहे. या घुसखोरांमुळे आदिवासी मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. अनेक मुलींची हत्याही करण्यात आली. तर काहीना जिवंत जाळण्यात आलं आहे. या लोकांना झारखंड सरकार संरक्षण देत आहे. लव्ह जिहादची सुरुवातही झारखंडमध्ये झाली. झारखंडनेच लव्ह जिहाद हा शब्द दिला", असे ते म्हणाले.