yuva MAharashtra गुणवंतांसह निकालाचा टक्का वाढला! राज्यात एकमेव विद्यार्थिनी शतप्रतिशत !

गुणवंतांसह निकालाचा टक्का वाढला! राज्यात एकमेव विद्यार्थिनी शतप्रतिशत !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ मे २०२४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा गुणवंतांसह बारावी निकालाचा टक्कादेखील वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला. कोकण आणि नाशिकनंतर निकालात पुणे विभाग आघाडीवर आहे. तसेच 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे गुणवंतही यंदा एक हजाराने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर यावेळी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यातील 3 हजार 320 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. यंदा 92.60 टक्के मुले, तर 95.49 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी 7 हजार 696 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते, तर यंदा 8 हजार 782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. त्यामुळे गुणवंतांचा टक्का यंदा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 14 लाख 33 हजार 371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 94 हजार 286 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी 95.44 टक्के, तर विद्यार्थ्यांचा निकाल 91.60 टक्के आहे. त्यामुळे मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 3.84 टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, तर त्याखालोखाल नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर, नागपूर या विभागांचा निकाल आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. परीक्षेदरम्यान देण्यात आलेल्या शाळा तेथे परीक्षा केंद्र, 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा आदी सुविधा यंदाही बंद करण्यात आल्या होत्या आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक सर्व कडक उपाययोजना करीत परीक्षा घेण्यात आली.

गुणपडताळणी, छायाप्रतीबाबत…

ऑनलाईन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळविलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या https://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाद्वारे स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

पुरवणी परीक्षेसाठी 27 मेपासून अर्ज प्रक्रिया

सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 27 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

समुपदेशन सेवा उपलब्ध

निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने मोफत ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीचे भ्रमणध्वनी क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.