| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ मे २०२४
देशात भाजपकडून सुरू असलेलं राजकारण, विरोधकांना तुरूंगात टाकणे, मोदी-शहांची भविष्यातील धोरणं लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापलं आहे. शरद पवारांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक वक्तव्य शरद पवारांना डिवचलं आहे. 'शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील,' असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे.
"अनेकवेळा शरद पवार काँग्रेसमध्ये गेले"
"राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, असं शरद पवारांचं मत असेल, त्यात काही नवल नाही. यापूर्वी शरद पवारांनी पक्ष तयार केले आणि अनेकवेळा काँग्रेसमध्ये गेले आहेत. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य नाही. त्यामुळे लोकसभेनंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
"...तर आमच्यासाठी चांगलंच आहे"
"अनेक पक्ष भाजपमुळे त्रासलेले असल्यानं काँग्रेस हा एकच पर्याय आहे, असं अनेक प्रादेशिक पक्षांना वाटतं. त्याआधारावरून शरद पवार यांनी विधान केलं असेल. काँग्रेस पक्ष मजबूत होत असेल, तर आमच्यासाठी चांगलंच आहे. पण, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे," असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विलनीकरणच्या मुद्द्यावरून डिवचलं आहे.
"पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत," असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं आहे.