| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २३ मे २०२४
सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे. शहरात अतिक्रमण, आरोग्यबरोबरच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त हवे, अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे.
बुधवारी आयुक्त शुभम गुप्ता मिरज विभागीय कार्यालयात आले होते. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, वसीम शेख आदी सदस्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली. शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शाहू चौक ते पोलीस स्टेशन, अब्दुल करीम खां चौक ते पोलीस स्टेशन, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्यांचे रुंदीकरण, रस्ता कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे, भटकी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त, मिरज कार्यालय नूतनीकरण आणि जन्म व मृत्यू विभागात कर्मचारी नेमणूक, शहरातील जटिल होत चाललेले अतिक्रमण समस्या आदी विषयांवर चर्चा केली.
शहरातील या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्तबरोबरच उपयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार, अतिक्रमणसाठी स्वतंत्र अधिकारी आणि पूर्ण वेळ आरोग्यधिकारी नेमण्याची मागणी केली.