yuva MAharashtra सांगलीत ३० मे ते २ जून दरम्यान कृष्णामाई ग्रीष्मोत्सवाचे आयोजन !

सांगलीत ३० मे ते २ जून दरम्यान कृष्णामाई ग्रीष्मोत्सवाचे आयोजन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
सांगली परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कृष्णा नदी तिरी यावेत, नदीची परिस्थिती जाणून घ्यावी आणि ती बदलण्यासाठी आपले योगदान द्यावे, याकरिता सांगली महानगरपालिका व 'चला जाणून या नदीला' उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने 30 मे ते दोन जून दरम्यान कृष्णामाई ग्रीष्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉ. मनोज पाटील यांनी दिली. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपक्रमाची माहिती देताना डॉ. मनोज पाटील बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. मनोज पाटील म्हणाले की, कृष्णा नदीतील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक संस्था व सामाजिक भावना असणाऱ्या व्यक्ती यांना आपल्या कार्याची आणि आपल्या भावनाची मांडणी करायला मिळावी व त्यांचा 'सन्मान' व्हावा अशी व्यवस्था. त्यामध्ये विविध कार्यशाळा चर्चासत्रे आणि तज्ञांची भाषणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या सहभागी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे, असे डॉ. पाटील त्यांनी सांगितले.


याबाबत बोलताना डॉ. पाटील पुढे म्हणाले की, सांगली परिसरातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, आणि महिलांच्या संस्थांच्या माध्यमातून नदी, माती यांचे संरक्षण वृक्षांचे संवर्धन, शहराची स्वच्छता, सौंदर्यवर्धन आणि पर्यायाने संपूर्ण पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने प्रस्तुत सारे विषय घरोघरी पोचवावा आणि त्याची अंमलबजावणी होऊन पहिल्यांदा मानस परिवर्तन त्यानंतर व्यवहार परिवर्तन आणि अंतिमतः परिस्थिती परिवर्तन होईल, असा प्रयत्न सर्वांनी करावा अशी अपेक्षाही डॉ. मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

या व्यवस्थेला जोडून अनेक प्रकारचे स्टॉल्स...
1. ज्याच्यामध्ये पर्यावरण पूरक जीवनशैलीला उपयुक्त असलेल्या उत्पादनांचा निर्माण करणारे उद्योजक व्यापार करणारे व्यापारी,
2. आपल्या खाद्य संस्कृतीची  विविधता आणि नवीनता याची झलक देणारे आणि आनंद देणारे स्टॉल्स, त्याचा आनंद घेणारे लोक,
3. विविध स्पर्धा, त्या स्पर्धांचे प्रायोजक,
4. विविध प्रदर्शने, त्या प्रदर्शनांचे प्रेक्षक, 
5.विविध कला, त्या कलांचे शिक्षक,
6. शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्यामुळे शैक्षणिक साहित्याची खरेदी विक्री करण्याची संधी,
7. खेळांचे साहित्य त्याची साधने उपकरणे यांची विक्री आणि खरेदी, 
8.सेंद्रिय शेती पर्यावरणपूरक बगीचा निर्माण आणि व्यवस्थापन यासाठी लागणाऱ्या साधनांची विक्री आणि खरेदी, 
9.शासकीय उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स, 
10.सोलर आणि बाईक्स यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा, विविध प्रकारच्या कार्यशाळा, प्रशिक्षण व कलांविषयी नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे पर्यावरणपूरकदृष्ट्या होणार असून, तेथे येणाऱ्या प्रत्येकाला नदीच्या सध्याची परिस्थितीची जाणीव होऊन ती सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा डॉ. मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कार्यक्रमास लोक सहभागामुळे मिळालेल्या यशाची माहिती दिली.

सांगली महापालिकेचे आयुक्त व प्रशासक शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी चला जाणूया नदीला या उपक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज पाटील, सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, निसर्गप्रेमी डॉ. रवींद्र होरा, सांगली शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था व महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये राजेंद्र जोशी, डॉ. माधवी पटवर्धन, सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, गोपाल मर्दा, विलासराव चौथाई, सतीश दुधाळ, संतोष बापट, नदी विषयावर पीएचडी करणारे बबलू हेगडे, मालोजी माने यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मनोज पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र होरा यांनी केले.