| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागासह मुंबई आणि आसपासच्या परिसरात धुळीचे वादळ येऊन गेले. या वादळावेळी मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा वादळाचा इशारा दिला आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याने म्हटले की, पुढील काही दिवसांत नुंदरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात ताशी 30-40 किमी प्रतितास प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
घराबाहेर जाताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते.
परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कोकणात मान्सून लवकर दाखल होणार, असेही सांगण्यात येत आहे.