| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२४
महाविकास आघाडी, महायुती यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या भेटी दरम्यान, कुंडल (ता. पलूस) येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट झाली.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सपत्नीक पद्माळे (ता. मिरज) येथे तर महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी चिंचणी (ता. तासगाव) येथे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी भाळवणी (ता. खानापूर) येथे मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित अपक्ष उमेदवारांनीही आपल्या मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबीयांसह मतदान केले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमनताई यांच्यासह अंबाबाई तालीम संस्थेची महिला विकास केंद्र येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली, आई विजयमाला कदम, डॉ. जितेश कदम यांनी सोनसळ (ता. कडेगाव) येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, सदाशिवराव पाटील, विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमनताई पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आदी दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळी ता. कवठेमहांकाळ येथे मतदान केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखराळे (ता. वाळवा) येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, उद्योजक राजवर्धन पाटील होते.
हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे मतदान केले. चिखली (ता. शिराळा) येथील मतदान केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनीतादेवी नाईक, मुली शर्मिला, मोनालीसा व पल्लवी होत्या.
अनेक भागात उष्णतेची लाट असतानाही मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा करून मतदानाचा हक्क बजावला. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.