yuva MAharashtra प्रचारतोफांवर पावसाचा मारा, अनेक जिल्ह्यात मुसळधारा, बळीराजाचं मोठं नुकसान, सांगलीत ऊसशेती भुईसपाट...

प्रचारतोफांवर पावसाचा मारा, अनेक जिल्ह्यात मुसळधारा, बळीराजाचं मोठं नुकसान, सांगलीत ऊसशेती भुईसपाट...



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ मे २०२४
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंड होण्यापूर्वीच पावसामुळे विझल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राजकीय नेत्यांनी (Election) आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भरपावसातही वातावरण तापतं ठेऊन सांगता सभा गाजल्या.

राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार (Rain) पावसाने हेजरी लावली. त्यामध्ये, पुणे, सातारा, सांगली (Sangli), बेळगाव, मिरज, बीड, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकटाडही ऐकायला मिळाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजांच्या ताराही तुटल्या आहेत. 

सांगली जिल्ह्यातील मिरजेत सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज तारा जागोजागी तुटल्याने शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या कटींग करणारे मशीन आणून रिक्षा बाहेर काढल्या. येथील तीन रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 


घरात शिरले पाणी

मुळासकट झाड पडून काही ठिकणी रस्ता पूर्ण बंद झाला आहे. जागोजागी वीज तारा तुटल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. शास्त्री चौक, अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घरात शिरले. मिरज अग्निशमन दलाचे जवान झाडे पडलेल्या ठिकाणी जाऊन युद्ध पातळीवर मदतकार्य करत आहेत.

शेतीचं मोठं नुकसान, ऊसशेती भुईसपाट

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या गारपीटीने सर्वानाच झोडपले होते. या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झाली आहे. भाजीपाल्याचे तर फार मोठे नुकसान झाले असून कुरळप येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला दोन एकर डागर भोपळा हाता-तोंडाला आलेल्या गारपिटीमुळे फुटला आहे.त्यांचे फार मोठे नुकसान झाले. तसेच कुरळप येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचे ही नुकसान झाले आहे. ऊसशेती भुई सपाट झाली असून उसाची पाने गारेमुळे चिंधाडली आहेत. त्यामुळे, शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

बेळगावात 1 तास मुसळधार

बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती, उकाड्याने जनता हैराण झाली होती.सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते, त्यामुळे उष्मा प्रचंड वाढला होता.सव्वा चार वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.काही वेळात पावसाचे थेंब पडण्यास प्रारंभ झाला आणि लगेच मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून सुखद गारव्याची अनुभूती मिळाली. मात्र, शेतीपिकांचे नुकसान झालं आहे. 

बेळगाव शहरात जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साठले होते. गटारींची साफसफाई झालेली नसल्याने गटारी तुंबून रस्त्यावर पाणी वाहत होते.शनिवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने खरेदीसाठी आलेल्या जनतेची तारांबळ उडाली. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजी व्यापाऱ्यांना देखील आसरा शोधावा लागला. 

11 ते 15 जूनपर्यंत येलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.