| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ मे २०२४
लोकसभेच्या मतदानादरम्यान येत असलेल्या सर्व्हेनुसार ही निवडणूक भाजपासाठी सोपी नाही, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत न्यूज २४ वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही. पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे आम्ही विजय मिळवू, असे आम्हाला वाटते.
भाजपाला महाराष्ट्रात विजय मिळवणे तितके सोपे नाही, अशी चर्चा दिल्लीत आहे. यासंबंधीही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, निवडणुकीत आव्हान तर असते. आपण जिंकणारच आहोत, असे समजून चाललो की, आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात. त्यामुळे मी प्रत्येक निवडणूक आव्हान समजूनच लढत आलो आहे. महाराष्ट्रात विजय मिळविण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी होत आहे. प्रचारासाठी फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता आम्हाला विजयाची खात्री आहे, असे ते म्हणाले.
आम्ही नेहमीच मित्रपंक्षाचा सन्मान केला
भाजपाशी ना मैत्री चांगली ना शत्रूत्व, असे म्हटले जाते. मित्रपक्षांना ते संपवतात आणि विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतात? या प्रश्नावर उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण दिले. “आमच्याकडे ११५ आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार आहेत. आम्हाला सत्तेची लालसा असती तर मुख्यमंत्रीपद आमच्याकडे ठेवले असते. पण आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार केला. उद्धव ठाकरेंशी आमचा वाद खुर्चीचा नाही, तर विचारांचा होता. हा मुद्दाही आम्ही स्पष्ट केली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून विकासाचे मुद्दे मागे पडले असून आरक्षण, वारसा कर आणि इतर मुद्दे पुढे आले आहेत, याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत आहोत. पण विरोधक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत. राजकारणात विरोधकांच्या आरोपांना त्या त्या वेळी उत्तर दिले नाही, तर तेच सत्य वाटू शकते. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत आहोत.
“भाजपाला संविधान बदलायचे असल्यामुळे ४०० हून अधिक जागा हव्या आहेत, असा अपप्रचार आमच्या विरोधात केला गेला. जे तज्ज्ञ आहेत, त्यांना संविधान अशापद्धतीन बदला येणार नाही, याची कल्पना आहे. सर्वोच्च न्यायालयानेही संविधानाला हात लावता येणार नाही, असे निर्णय दिले आहेत. मात्र जनतेमध्ये जाऊन वारंवार ही भूमिका मांडल्यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्हाला याचे उत्तर द्यावेच लागेल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.