yuva MAharashtra आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली !

आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली !



| सांगली समाचार वृत्त |
देहराडून - दि. २३ मे २०२४
उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील एम्समध्ये आश्चर्यकारक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका नर्सिंग ऑफिसरने ऑपरेशन थिएटरमध्ये महिला डॉक्टरसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे डॉक्टरांमध्ये मोठा संताप होता. मंगळवारी पोलिसांनी एम्समध्ये जात आरोपीला अटक केली आहे. परंतु त्यासाठी वापरण्यात आलेला मार्ग चर्चेत आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी आलेली पोलिसांची जीप चौथ्या मजल्यावर नेण्यात आली. तसेच ही आयसीयू, जनरल वार्डातून चालवत नेण्यात आली. 


आरोपीविरोधात तेथील कर्मचाऱ्यांमध्ये राग असल्याने त्याला संरक्षण देण्यासाठी पोलिसांची जीप आत नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचा व्हिडीओ जारी झाला आहे. महिला डॉक्टरने २१ मे रोजी तक्रार दिली होती. ही घटना १९ मे ची असल्याचे सांगितले जात आहे. यावर कारवाई करत पोलिसांनी मंगळवारी रात्री सतीश कुमारला अटक केली. आरोपी हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने महिला डॉक्टरला अश्लील एसएमएसही पाठवले होते, असेही बोलले जात आहे. उत्तराखंड महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून एम्स प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.