| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ मे २०२४
"हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायचीच !" महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचारातील हे गाजलेलं वाक्य… लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडताना तुतारी, मशाल आणि पंज्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सध्यातरी वातावरण तसं चील आहे… पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार आपल्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशा बऱ्याच वावड्या उठल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरत असताना आता लोकांची सहानुभूती लाभत असलेले हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याने राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडण्याची शक्यता आहे… पण खरंच शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन्ही मोठे नेते आपापली पॉलिटिकल आयडेंटिटी सोडून काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता का आहे? याचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कसा होईल? हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात…
तर गोष्ट सुरू होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्टेटमेंटपासून… राज्यातील दोन पक्ष लवकरच संपुष्टात येतील किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होतील. असं जाहीरपणे सांगून चव्हाणांनी नव्या वादाला तोंड फोडलं. चव्हाणांच्या या स्टेटमेंटनंतर सगळ्यांच्याच नजरा तुतारी आणि मशालीकडे गेल्या… हे कमी होतं की काय म्हणून शरद पवारांनीही यात भर घातली… लवकरच देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील… व काँग्रेसमध्ये विलीन होतील… असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाची आणि काँग्रेसची विचारधारा एकच असून पुढील निर्णय सहकाऱ्यांना विचारून घेतला जाईल… असं स्टेटमेंट करून शरद पवार आपल्या पक्षासह लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, या चर्चेला आणखीनच हवा दिली. पण आता थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होतील, अशी गॅरंटी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाची उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या वेळेस पंतप्रधानांनी अनेक गौप्यस्फोट केले… नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणारच आहे. हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणायचे की, मला काँग्रेससोबत जाण्याचे वेळ आली की, मी माझे दुकान बंद करेल. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही…असं म्हणत पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये दिसतील यावर जणू शिक्कामोर्तब केलाय…
एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला… तर पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमधून केली… काँग्रेस पक्षात असतानाच त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मान मिळाला… नंतरच राजकारण बदललं आणि त्यांनी राजकारणाचं नवं समीकरण जन्माला घालत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली… पण असं असलं तरी पक्षाचा बेस हा काँग्रेसच्या विचारांचाच होता… म्हणूनच की काय त्यानंतर लगेच वर्षभरात झालेल्या निवडणुकीनंतर त्यांनी याच काँग्रेस सोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं… यानंतर महाराष्ट्रातील त्यांचं राजकारण काँग्रेसला पूरक असंच राहिलं. सध्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष टिकवण हे अवघड आहे… आधीच अजित दादांनी पक्षात बंड करून राष्ट्रवादीवर क्लेम केल्याने याला आणखीनच बळ मिळालं… हाच धडा लक्षात घेऊन राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना आता मुख्य धारेतील पक्षाची गरज वाटतेय.. म्हणूनच पवार हे कुठलाही आड पडदा न ठेवता काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं बोलायला चान्स उरतो…
प्रश्न उरतो तो शिवसेनेचा… मुळात शिवसेनेचा जन्मच काँग्रेसला विरोध करून झाली… बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विचारांचा जाहीर सभेतून भुगा पाडत आपलं राजकारण पुढे रेटलं. शिवसेनेच्या उदयामुळेच काँग्रेसचं मुंबईतील अस्तित्व संपुष्टात आलं… त्यात हिंदुत्व हा बेस धरून शिवसेना राजकारण करत असल्याने तो पक्ष कधी काँग्रेसच्या सोबत जाईल याचा कोणी विचारही केला नव्हता… पण हे घडलं 2019 मध्ये… महाविकास आघाडीचा प्रयोग करून शरद पवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांची मोट बांधली… यानंतरचा गेला बाजार इतिहास आपल्याला माहित आहेच! थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसच्या फेवर मध्ये गेली… हळूहळू पक्षाच्या हिंदुत्वाच्या कन्सेप्टही बदलत गेल्या.. सध्याचं राजकारण भावनिकतेवर चालत असलं तरी यापुढे त्यांना एक कुठलातरी वैचारिक स्टॅन्ड घेणं गरजेचं आहे… अशा वेळेस उत्तरा अर्थातच येतं ते नाही! उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची सध्यातरी शक्यता दिसत नाही… कारण यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या सेप्रेट आयडेंटिटीला धक्का बसतो.. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला पूरक म्हणजेच भाजपच्या विरोधात भूमिका घेतील. पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा होत असलेल्या चर्चा या चर्चाच म्हणाव्या लागतील…