| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २९ मे २०२४
जिओ पॉलिटिकल एक्सपर्ट आणि ज्येष्ठ पत्रकार फरीद झकारिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे असल्याचे म्हटले आहे. एकीकडे ते स्वत:ला सामान्य माणूस म्हणून सिद्ध करतात आणि दुसरीकडे ते एक कुशल टेक्नोक्रॅटही आहे. ही ताकदच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. ते असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदींना राजकारणाची चांगली समज आहे, त्यामुळे ही समजच त्यांना खूप यशस्वी बनवते.
फरीद झकेरिया म्हणाले की, पीएम मोदींची तिसरी टर्म झाल्यानंतर जगात त्यांचा प्रभाव आणखी वाढेल. ते येत्या काळात ग्लोबल लीडर बनणार. कारण त्यांच्याकडे सर्वात मोठ्या लोकशाहीची ताकद आहे आणि ती त्यांना जगातील त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत मजबूत बनवते. या अनुभवी पत्रकाराने सांगितले की, मुख्य प्रश्न हा असेल की, पीएम मोदींना तिसरी टर्म मिळाली तर ते त्यात काय काम करतील. ते खूप लोकप्रिय आहेत आणि देशातील एक मोठी लोकसंख्या त्यांचं ऐकते. अशा परिस्थितीत त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा कोण सांभाळणार हे फार महत्वाचे ठरणार आहे.
केवळ भारतच चीनला आव्हान देऊ शकतो
फरीद झकेरिया यांनी चीनचा उदय हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तव असल्याचे म्हटले आहे आणि त्याचवेळी आशिया खंडात चीनला आव्हान देऊ शकणारा भारत हा एकमेव देश आहे. ते म्हणाले की, चीनचा उदय आणि रशियाची माघार जागतिक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत जगासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. चीनला अनेक पातळ्यांवर आव्हान देण्याची भारताची कुवत आहे.
भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान मिळायला हवे
भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान मिळायला हवे, पण चीन व्हेटो पावर वापरुन ते थांबवू शकतो. त्यांनी अधोरेखित करत सांगितलं की, येत्या काळात UNSC सारख्या संघटनांना कमी महत्त्व मिळेल आणि G20 सारख्या गटांना अधिक महत्त्व मिळेल.
भारताला आर्थिक आघाडीवर अधिक प्रयत्न करावे लागणार
भारताला आर्थिकदृष्ट्या आणि वेगाने विकसित करावे लागेल. भारत अजूनही त्याच्या वास्तविक क्षमतेच्या मागे आहे. आजही आर्थिकदृष्ट्या चीन भारतापेक्षा पाचपट मोठा आहे. दरडोई जीडीपीच्याबाबतीत भारत अजूनही गरीब देश आहे. भारताचे दरडोई उत्पन्न $2,700 आहे, ज्यामुळे भारत G20 मध्ये सर्वात गरीब देश आहे. म्हणून, आपले वजन वाढविण्यासाठी, ते आर्थिकदृष्ट्या थोडे वेगाने पुढे जाणे आवश्यक आहे. भारतासारख्या गरीब देशाला 9% दराने विकास करणे आवश्यक आहे.