| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी शनिवारी सांगली शहरात मोटारसायकल रॅली काढली. यावेळी फटाक्याची आतषबाजी, फुलांच्या वर्षावात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करीत विशालदादांना आशिर्वादही दिला. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला.
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दिवसेदिवस त्यांना प्रतिसाद वाढत चालला आहे. सर्व तालुक्यांचा प्रचार दौरा त्यांनी नुकताच पुर्ण केला. ग्रामीण भागातून विशालदादांना मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. ग्रामीण भागानंतर सांगलीकरांकडून जोरदार स्वागत, महिलांकडून औक्षण, तरुणाईत उत्साह करण्यात आले.
विशालदादा पाटील यांनी आता शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्रवारी मिरज शहरातील रॅलीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शनिवारी विशालदादांनी सांगली शहरात मोटारसायकल रॅली काढली. सकाळी वानलेसवाडी येथून रॅलीला सुरूवात झाली. हसनी आश्रम, स्फुर्ती चौक, दत्तनगर, हनुमाननगर, प्रगती कॉलनी, शामरावनगर परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, महिला, तरुण सहभागी झाले होते.
दुपारी हरिपूर रोड, सिद्धार्थ परिसर, गावभाग, फौजदार गल्ली येथे रॅली काढली. मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विशालदादांनी आशिर्वाद घेतला. पंचमुखी मारुती रोडवरील हनुमान मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. खणभाग, बदाम चौक, महापालिका हरभट रोड, सांगलीवाडीत रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. भर उन्हातही महिला, नागरिक विशालदादांच्यासाठी रस्त्यावर थांबले होते. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. फटाक्याची आतषबाजी व फुलांचा वर्षावही करण्यात आला. यानंतर दत्तनगर, काकानगर, पंचशीलनगर, चिंतामणीनगर, अहिल्यानगर, लक्ष्मीदेऊळ, मार्केट यार्ड, टिंबर एरिया, वडर गल्लीमार्गे काँग्रेस कमिटी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली.