yuva MAharashtra महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! - शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! - शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ मे २०२४
महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे काही कॉफी दुकानांच्या नावाखाली मिनी लॉज, स्मोकिंग झोन आणि गैरकृत्य चालू झाले. ते त्वरित बंद करण्यात यावेत, तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॉफी दुकान उद्ध्वस्त करून यांचा व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रहित करण्यात यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना २० मे या दिवशी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. या वेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले म्हणाले की, आम्ही याविषयी गेल्या १ वर्षापासून जनजागृती मोहीम चालू केली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी परिपत्रक काढून संपूर्ण राज्यात कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात सांगली शहरात काही कॉफी दुकानांत अवैध प्रकार चालू आहेत. या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना पाठवून याची निश्चित करून अशा प्रकारच्या 'कॉफी शॉप'ची नावे आपणास देत आहोत.


या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात अनधिकृतपणे काही कॉफी शॉपची दुकाने चालू आहेत. जिथे मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुला-मुलींना 'कंपार्टमेंट्स' आणि 'पार्टी हॉल' उपलब्ध करून दिले जात आहेत. काही ठिकाणी अंधार्‍या खोलीत १ घंट्याला २०० ते ३०० रुपये पैसे घेऊन 'मिनी लॉजेस बेड्स' उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या ठिकाणी जाणार्‍या बहुतेक ग्राहकांची संख्या ही शाळा आणि महाविद्यालयामधील अल्पवयीन मुला-मुलींची आहे, तसेच काही ठिकाणी गांजा, ड्रग्ज त्याचसमवेत 'स्मोकिंग झोन' आणि खोल्या उपलब्ध करून तिथे सिगारेटही पुरवले जात आहेत. अशा प्रकारे आपल्या तरुण आणि तरुणी यांना बिघडवण्याचे काम हे या माध्यमातून चालू आहे. महानगरपालिकेकडून व्यवसायासाठी परवाना घेत असतांना कुठल्याही कंपार्टमेंटची माहिती न देता हे सर्व अनधिकृतपणे चालू आहे. बापट मळा, मार्केट यार्ड येथील कॅफे हँगऑन या ठिकाणी कंपार्टमेंट्समधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा वापर करून अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

या संदर्भात नितीन चौगुले म्हणाले, ''महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन अनधिकृत कॅफेची त्यांना सर्व माहिती दिली, तेव्हा त्यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफेवर कारवाई करून ती बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. २१ मे या दिवशी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात यावेत, अशी मागणी आम्ही करणार आहोत. याविषयी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांशी अनधिकृत कॅफेविषयी चर्चा झाली असून त्यांनीही अवैध कॅफे बंद करण्यात येतील, असे सांगितले आहे.''