yuva MAharashtra मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी !

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ मे २०२४
अलीकडेच काही देशांनी भारतीय मसाल्यांच्या निर्यातीबाबतच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, मसाले बोर्डाने निर्यातदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही उत्पादनामध्ये इथिलीन ऑक्साइड (ETO) नावाच्या कार्सिनोजेनिक केमिकलची भेसळ रोखणे हा या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. बोर्डाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निर्यातदारांना मसाल्यांचे स्टरलाइज किंवा फ्यूमिगेट करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वापरासाठी ईटीओ वापरणे टाळावे लागेल.

कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करु नये !

याशिवाय स्‍टोरेज/वेयरहाऊस, पॅकेजिंग मटेरियल सप्लायर इत्यादी कोणत्याही टप्प्यावर केमिकलचा वापर करु नये, असेही सांगण्यात आले. निर्यातदाराला संपूर्ण पुरवठा साखळीत मसाले आणि मसाल्याच्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल ईटीओची भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यांनी EtO ला घातक पदार्थ म्हणून ओळखले पाहिजे आणि त्यांच्या फूड सेफ्टी मॅनेजमेंट स‍िस्‍टम आणि फूड सेफ्टी प्‍लानमध्ये EtO प्रतिबंधित करण्याच्या उपायांचा समावेश केला पाहिजे.


ईटीओच्या भेसळीची चौकशी करावी लागेल

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निर्यातदाराला कच्चा माल, प्रोसेस‍िंग साहित्य, पॅकेजिंग साहित्य आणि तयार मसाल्यांमध्ये ईटीओची भेसळ तपासावी लागेल. पुरवठा साखळीच्या कोणत्याही टप्प्यावर ईटीओ आढळल्यास, निर्यातदारांना ते का घडले ते शोधावे लागेल. तसेच भविष्यात असे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्याचबरोबर अशा उपाययोजनांच्या संपूर्ण नोंदीही ठेवाव्या लागतील. मसाल्यांचे स्टरलाइज करण्यासाठी पर्यायी पद्धतींचा अवलंब करता येईल, असेही मसाले बोर्डाने सूचित केले आहे.