शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावरील सुरले पाटील वस्ती जवळील पुलाखाली बेवारस ट्रॅव्हल बॅगेमध्ये ठेवलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत अद्याप समजू शकले नाही. ही घटना काल सोमवार दि.२० रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान समजली. सदरची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र समजल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी शिराळा पोलिसांनी लगेच धाव घेतली.याठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ञांना बोलवण्यात आले होते.हा खून पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , या परिसरात दुर्गंधी येत असल्याचे फोन वरून कळविण्यात त्यावरून पोलीस ठाण्यात कळविण्यात आले.यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम , सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर यांच्यासह सुभाष पाटील, संदीप पाटील, सुनील पेटकर, नितीन यादव ,अमोल साठे, सुनील पाटोळे, महेश गायकवाड ,संदीप भानुसे, रजनी जाधव, अमर जाधव यांनी धाव घेतली. याठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला पूर्ण कुजलेल्या अवस्थेत गळ्याभोवती व शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधल्याचे आढळून आले.
त्या मृतदेहाची कवटी , हाडे शिल्लक होती. याबाबत तातडीने श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. तसेच मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी डॉ.जुबेर मोमीन , डॉ.अनिरुद्ध काकडे , डॉ योगिता माने शवविच्छेदन केले. कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी , जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोखर , विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच ठसे तज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहाच्या अंगात पांढरा टी शर्ट , कंबरेला पंचरंगी दोरा आढळून आला.मृतदेहाचे काही अवशेष तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद हवालदार सुनील पेटकर यांनी दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत.