| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२४
राजकीय विश्लेषक, सेफॉलॉजिस्ट महाराष्ट्राच्या निकालांबाबत संभ्रमात आहेत. अवघी हयात राजकारणात घालवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निकालाचे कोडे पडलेले आहे. ब्रह्मदेवही निकाल सांगू शकणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचा निकाल त्यांना वाटतो तेवढा गुंतागुंतीचा नाही. दोन मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या निकालाचे भवितव्य ठरणार आहे. त्यातला जो मुद्दा भारी ठरेल, निकाल त्या बाजूने झुकणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजितदादांनी हे विधान केलेले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीबाबत भाष्य करताना ठाकरे- पवारांना सहानुभूती असल्याचे विधान केले होते. भुजबळ असे का म्हणाले हे कळायला मार्ग नाही, परंतु त्यांचे वक्तव्य महायुतीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे होते हे निश्चित.
देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार याबाबत देशातील तमाम राजकीय विश्लेषकांचे एकमत आहे. विश्लेषणात राजकारणाची सरमिसळ करणाऱ्या योगेंद्र यादव यांच्यासारख्या विश्लेषकांचा यात अपवाद सोडला तर सगळे अंदाज तिसरी बार मोदी सरकार हेच सांगतायत. योगेंद्र यादव यांच्या डोक्यात राजकीय अजेंडा असल्यामुळे निकालांचे अचूक भाकीत करण्याची त्यांची क्षमता नष्ट झालेली आहे. २०१९ मध्ये हे सिद्ध झालेले आहे. परंतु, मोदी सरकार येणार असे सांगणारे विश्लेषक महाराष्ट्र आणि बिहार बाबत गोंधळलेले दिसतात.
महाराष्ट्रात फुटलेले दोन पक्ष आधे इधर आणि आधे उधर असल्यामुळे कोणाची ताकद किती याची उकल पक्षाच्या नेत्यांनाही होताना दिसत नाही, हे अजित पवारांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. कोणाकडे किती आमदार, किती खासदार याचा ताळमेळ लागला असला तरी मतदारांचा कल नेमका कोणाकडे याचे गणित न सुटल्यामुळे हा गोंधळ होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हाच एकमेव आश्वासक चेहरा आहे. असा चेहरा ज्याच्याकडे विकासाचा रोड मॅप आहे. राहुल गांधी जातीच्या नावाने मत मागतायत, आरक्षणाचे गाजर दाखवून मुस्लीमांची मतांची बेगमी करतायत. उद्धव ठाकरेही मोदींची भीती दाखवून मुस्लीमांची मतं मागतायत. महायुतीचे उमेदवार मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागतायत. इंडी आघाडीतील पक्ष मात्र पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचे नावही घेताना दिसत नाहीत.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले आहेत की, सर्वात मोठ्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल. म्हणजे त्यांनाही राहुल गांधींचे नाव आडून आडून सुचवावे लागत आहे. महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरेंना राहुल गांधी यांच्यापेक्षा स्वत:चा चेहरा जास्त आश्वासक वाटतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च पंतप्रधान पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, मला पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, असे त्यांनाही सांगता आलेले नाही. इंडी आघाडीतील अन्य नेत्यांप्रमाणे ते मोदींचा पराभव करण्यासाठी मत मागतायत.
मोदींना स्वत:बाबत इतकी खात्री आहे की, सगळ्या जाहीर सभांमध्ये ते सांगतायत तुम्ही उमेदवाराला नाही, मला मतदान करता. रालोआचे खासदार निवडून देण्यासाठी केलेले मतदान माझ्या खात्यात जमा होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाने अनेक दगड-धोंडे जिंकून आले. २०१९ मध्ये याची पुनरावृत्ती झाली. गेल्या १० वर्षांच्या काळात केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांतून मोदींनी स्वत:ची एक व्होट बँक बनवली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कोट्यवधी लाभार्थी या व्होटबँकचे सदस्य आहेत. 'मोदी की गारंटी' अशी हाळी देत त्यांनी या व्होट बँकला साद घातली आहे.
देशभरात उन्हाने तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असताना महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र आजवर झालेल्या सहा टप्प्यात दिसले. महिला मतदार म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येतील निम्मा मतदार. या मतदारांवर ज्याचा प्रभाव त्याच्या हाती देशाची सत्ता हे साधे गणित आहे. हा महिला वर्ग मोदींच्या योजनांचा सगळ्या मोठा लाभार्थी ठरला आहे. जर देशभरातील महिला मतदार मोदींच्या कामामुळे प्रभावित झाल्या असतील, त्यांच्या जीवनावर केंद्र सरकारच्या योजनांचा सकारात्मक ठसा उमटला असेल तर महाराष्ट्रातील महिला त्याला अपवाद कशा असतील?
ज्यांना घरात नळ, वीज, शौचालय आणि बेघरांना घर मिळाले असेल, दर महा पाच किलो धान्य मिळाले असेल, उज्वला योजने अंतर्गत गॅस सिलिंडर मिळाले तरी कोणताही ठोस पर्याय नसताना त्या मोदींना हटवण्यासाठी मतदान करतील?
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला २७.८४ टक्के मतदान झाले होते. शिवसेनेचा आकडा २३.५० टक्के होता. राष्ट्रवादी काँग्रेसला १५.६६ टक्के आणि काँग्रेसला १६.४१ टक्के मत पडली होती. याचा अर्थ शिवसेना भाजपा युतीला गेल्या वेळी मिळालेली मतं ५० टक्क्यांपेक्षा जास्त होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचा एकूण टक्का जेमतेम ३२ होता. म्हणजे भाजपा पेक्षा फक्त चार टक्के मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीतही मोदींच्या बाजूने आणि मोदींच्या विरोधात अशी मत विभागणी झाली होती. महाराष्ट्रात मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच युतीच्या पारड्यात मतं पडली होती. यंदाही तशीच मत विभागणी झाली तर त्याचा फायदा कोणाला होणार हे उघड गुपित आहे. शिवसेनेला गेल्या वेळी मोदींच्या चेहऱ्यामुळे मिळालेली मतं यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पारड्यात पडणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ही मतं मिळणार आहेत. महायुतीच्या मतांमध्ये यंदा राज ठाकरे यांच्या मनसेच्या मतांची भर पडलेली आहे.
मोदींच्या नावाने मत मिळाली नाहीत, उलट भाजपाला ठाकरे नावामुळे मतं मिळाली असा दावा उद्धव ठाकरे यांनी वारंवार केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती आहे, असा दावा चाय-बिस्कुट करतायत, तो किती खरा होता हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.