Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे बक्षीस



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १२ मे २०२४
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना तब्बल साडेतीन पगार बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत. गतवर्षी अडीच पगार देण्यात आला होता. यंदा बँकेला विक्रमी २०४ कोटींचा नफा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बक्षीस पगारात एका पगाराने वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची घोषणा केली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नफा वाटणीबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. जिल्हा बॅँकेला मार्च २०२४ अखेर २०४ कोटींचा विक्रमी नफा झालेला आहे. बँकेचा नेट ग्रॉस एनपी १० टक्क्यांच्या आत, तर नेट एनपीए ५ टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे बँकेस आता रिझर्व्ह बॅँकेकडून मोबाइल बँकिंग, नेट बॅकिंग सेवेसाठी परवानगी मिळणार आहे. या बैठकीस जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालक विशाल पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड आदी उपस्थित होते.

बँकेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश

जिल्हा बँकेचा शाखा विस्तार करण्यासह मान्यता मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे दहा नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच, बँकेच्या सभासद संस्थांना आता थेट लाभांश देता येणार आहे. यंदा हा लाभांश १२ टक्के देण्याचा निर्णय झाला आहे.