| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
आईच्या नावासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे. यासह 1 मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रकिया पुढील सहा महिन्यांत सुरू होणार आहे.
महत्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वीच महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर आईच्या नावाचाही उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्यासह आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.
ई-फेरफार प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणी वेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश केला जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आईच्या नावाचा नवा कॉलम तयार केला जाणार आहे. यासंदर्भातच संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला एकूण तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या कालावधीत जुन्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागेल. यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर आईचे नाव जोडले जाईल.