| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २९ मे २०२४
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केलाय. त्यामध्ये राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आलंय. दरम्यान, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना कोर्टाकडून कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची दाट शक्यता आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वि. दा. सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी, २०२३ साली लंडनमध्ये दिलेल्या भाषणात राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणातील अहवाल न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अक्षी जैन यांच्या न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी म्हटलेय. तसंच याप्रकरणी न्यायालय राहुल गांधींना नोटीस बजावून त्यांना हजर राहण्यास सांगू शकते, असेही ते म्हणालेत.
राहुल गांधी काय म्हणाले ?
तक्रारीनुसार, राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दावा केला होता की, वि. दा. सावरकरांनी एका पुस्तकात असं लिहिलं होतं की त्यांच्यासह पाच ते सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली. त्याचा त्यांना (सावरकर) आनंद झाला. मात्र, यावर सावरकरांनी असं कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही, असं सात्यकी सावरकर म्हणाले. तसंच राहुल गांधींचे आरोप काल्पनिक, खोटे आणि वाईटट हेतूने असल्याचेही सात्यकीने आपल्या तक्रारीत म्हटलेय. पोलिसांनी अहवालात काय म्हटले?
मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला. तपासात सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याही पुस्तकात अशा घटनेबद्दल लिहिलेलं नाही, असे सांगितलेय. त्यानंतरही राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान अशी टीका करून सावरकरांची बदनामी केली. सात्यकी सावरकर यांनी दिलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पोलिसांनी म्हटलेय.