| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ मे २०२४
कॉंग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले शरद पवार
देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात धक्कादायक दावे केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
‘टीव्ही ९ मराठी’ने दिली होती बातमी
फेब्रुवारी महिन्यात ‘टीव्ही ९ मराठी’ने राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातमी दिली होती. त्यावेळी शरद पवार यांनी नकार दिला होता. परंतु आता शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, पुढील काही वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय असेल.
सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते स्पष्टच म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे.
उद्धव ठाकरेबाबत शरद पवार म्हणतात…
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत मत मांडले, ते म्हणाले, उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहे. परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे.