| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२४
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दि. १ मे रोजी सांगलीत प्रचारसभेसाठी येत आहेत, अशी माहिती भाजपचे खासदार संजय पाटील यांनी दिली. योगी आदित्यनाथ यांची सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी दुपारी ४ वाजता सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रथमच सांगलीत येत आहेत. सभेसाठी भाजपचे सर्व नेते तसेच मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सांगलीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीकडून भाजपा उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीत धुसपूस सुरू असली तरी भाजपासह महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यानच, आज, मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता ही निवडणूक आणखी चुरशीची आणि रंगतदार होणार आहे.