yuva MAharashtra मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा 'डेंजर झोन'मध्ये ?

मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा 'डेंजर झोन'मध्ये ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ मे २०२४
मोदींची सभा म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी, असे समीकरण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून बनले होते. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची नैय्या पार झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतही मोठ्या तीन राज्यात लोकांनी 'मोदी गॅरंटी'वर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांना मोदी गॅंरटीचा आधार मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आठही लोकसभेच्या मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आठपैकी पाच मतदारसंघात यावेळी सभा घेतल्या. म्हणजे जवळपास सगळ्या मराठवाड्यात मोदींनी प्रचार केला. नांदेड, बीड, लातूर या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर धाराशिव, परभणी या दोन जागा महायुतीतील घटक पक्षाला सोडण्यात आल्या होत्या.


मराठवाड्यात 26 एप्रिल, 7 आणि 13 मे अशा तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये बऱ्यापैकी उत्साह होता हे ही मतदानाच्या टक्केवारीत स्पष्ट झाले. परंतु मतदानानंतर जी आकडेमोड केली जाते, स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सर्व्हेचा हवाला बघितला तर वेगळेच चित्र समोर येताना दिसते आहे. अर्थात हा अंदाज असला तरी तो सत्ताधारी महायुतीसाठी धक्का देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील ज्या पाच मतदारसंघात सभा घेतलल्या त्यापैकी बीड वगळता चारही मतदारसंघातील उमेदवार डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते. लातूरचे सुधाकर श्रृंगारे, धाराशिवच्या अर्चना पाटील, परभणीचे महादेव जानकर यांच्या उल्लेख मोदींनी मेरे छोटे भाई असा केला होता ते आणि नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचा सूर सगळ्या बाजूंनी उमटताना दिसतोय. आता हा अंदाज खरा ठरतो? की मोदींची गॅरंटी चालते हे चार जून रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.