| सांगली समाचार वृत्त |
निरगुडसर - दि. २७ मे २०२४
बिबट्याने हल्ला केला आणि सुदैवाने रस्त्यात खड्डा आल्याने गाडी जोरात आदळली आणि बिबट्याची पकड सुटल्याने ज्ञानेश्वर लोखंडे हे शिक्षक वाचले त्यांच्या पायावर बिबट्याचे दोन दात घुसले, अशा परिस्थितीत नशीब बलवत्तर म्हणूनच वाचलो अशीच प्रतिक्रिया हल्ल्यातून बचावलेल्या शिक्षक ज्ञानेश्वर बाळू लोखंडे यांनी दिली. वळती (ता .आंबेगाव) येथील लोंढे वस्तीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून चाललेल्या शिक्षकावर हल्ला केला. पण रस्त्यात खड्डा आल्याने बिबट्याला हल्ला करता आला नाही ही घटना शनिवार (ता. २५ ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
आंबेगाव तालुक्यातील वळती ते शिंगवे रस्त्यावर लोंढे मळा असून येथील पुला नजीक कायम बिबट्यांचे वास्तव्य आहे. शनिवार (ता. २५ ) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका चार चाकी वाहनाचा पाठलाग केला त्यानंतर पुन्हा गवतामध्ये बिबट्या जाऊन लपला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी बिबट्याला पाहीले त्यामुळे पाच-सहा जण दुचाकीस्वार हे घाबरून जागेवरच थांबले त्याचवेळी मंचरहून आपले काम आटोपून शिक्षक ज्ञानेश्वर बाळू लोखंडे ( रा .वळती - लोखंडे वस्ती ) हे दुचाकीवरून घरी चालले होते, त्यांनी रस्त्यावर दुचाकी स्वार थांबलेले पाहिले. पण त्यांनी तशीच गाडी पुढे नेली पण गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. ज्ञानेश्वर लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून गाडी जोरात पळवली. सुदैवाने रस्त्यात खड्डा आल्याने गाडी जोरात आदळली आणि बिबट्याची पकड सुटली व ज्ञानेश्वर लोखंडे हे शिक्षक वाचले त्यांच्या पायावर बिबट्याचे दोन दात घुसले आहेत.
वळती येथील लोंढे वस्तीत पुलानजीक कायम बिबट्याचे वास्तव्य आहे,अनेकांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे परंतू आता बिबट्या वाहनांचा पाठलाग करू लागल्याने दुचाकी चालकांमध्ये मराठीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पिंजरा लावावा आणि बिबटयास जेरबंद करावे अशी मागणी वळती ग्रामस्थांनी केली आहे.