| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. ६ मे २०२४
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे. हे काम १५ मार्चपासून चालू करण्यात आले असून सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत भाविकांना मुखदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. दीड महिन्यांनंतरही हे काम पूर्ण होऊ न शकल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत वारकर्यांना चरण दर्शनाच्या शक्यता नसून केवळ मुखदर्शनावरच समाधान मानावे लागणार आहे.
४ मे या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मंदिरातील कामाची पहाणी करून त्याचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी पुरातत्व विभाग, वास्तूविशारद, तसेच बांधकाम करणारे उपस्थित होते. प्रत्यक्ष कामास प्रारंभ केल्यावर अनेक प्रकारची नवीन कामे समोर आली आणि ती करावी लागली. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जेव्हा प्रत्यक्ष काम चालू झाले, तेव्हा आतील फरशी काढल्यावर भिंतीची दुरुस्ती, काही दगडांची दुरुस्ती करावी लागली. काही दगडांना त्यांचे मूळ रूप द्यावे लागत आहे. आता भाविकांना २४ तास काचेच्या पेटीतील श्री विठ्ठलाचे 'लाईव्ह' दर्शन चालू आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागील फरशी काढणे, हे सर्वांत कौशल्याचे काम आहे. ही फरशी काढण्यासाठी ही पेटीही काही काळ काढावी लागेल आणि त्यामुळे २४ तास श्री विठ्ठलाचे 'लाईव्ह' दर्शनही काही काळ बंद होईल. या संदर्भात मंदिर समितीशी चर्चा केली असून त्याला त्यांनी मान्यता दिली आहे. कोणतेही संवर्धनाचे काम हे काळजीपूर्वक करावे लागते. त्यामुळे त्याला आवश्यक तो वेळ द्यावाच लागतो, तर ते गुणवत्तापूर्वक होते. हे संपूर्ण काम मोठे असून मेअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. यानंतर बाहेरील काम चालू राहील.
सध्या चालू असलेल्या कामावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कामे चांगल्या दर्जाची करून मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त करून देणे आवश्यक असल्याने कामे पूर्ण होण्यास थोडासा विलंब होत आहे. सभामंडप, गाभारा, तसेच अन्य सर्व कामे २५ मेच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.