| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० मे २०२४
अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं 2004 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. 2014 मध्ये तिने 'अजीब दास्तां है ये' या मालिकेतून पुनरागमन केलं, मात्र ही मालिका काही महिन्यांतच बंद झाली होती. सध्या सोनाली ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली तिच्या आजारपणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 2018 मध्ये सोनालीला कॅन्सरचं निदान झालं होतं.
“ते खरंच धक्कादायक होतं. मला कॅन्सर कसा होऊ शकतो, असा प्रश्न पडला होता. मी एका रिअॅलिटी शोमध्ये काम करत होते, तेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं होतं. आम्ही दर आठवड्याला शूटिंग करत होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही सतत शोमध्ये दिसत आणि अचानक एकेदिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरून लांब जाता, तेव्हा अर्थातच तुमच्याबद्दल चर्चा होऊ लागते. पण माझ्या तब्येतीत काहीतरी बरंवाईट जाणवत होतं. जेव्हा डॉक्टरकडे गेली आणि तपासण्या केल्या तेव्हा कॅन्सरचं निदान झालं. पहिल्यांदा मला हे फार छोटं असेल असं वाटलं होतं. पण जसजशा पुढे तपासण्या होत गेल्या, तसतसं आम्हाला समजलं की हा छोटा-मोठा आजार नाही. मला ते डॉक्टरांच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं. जेव्हा त्यांनी PET स्कॅन केला, तेव्हा माझ्या डॉक्टरांचा आणि पती गोल्डी बहलचा चेहराच पांढरा पडला होता”, असं सोनालीने सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “जेव्हा एखाद्या रुग्णाची PET स्कॅन केली जाते, तेव्हा कॅन्सरच्या पेशी दिसून येतात. त्यातून तुमच्या शरीरात कॅन्सर कुठे आणि किती पसरला आहे, ते समजतं. ज्यांनी माझा PET स्कॅन केला, त्यांनी सांगितलं की कॅन्सर माझ्या शरीरात इतका पसरला होता की स्कॅनिंग केल्यावर ते आम्ही ख्रिसमसच्या झाडासारखं दिसलं होतं. मला कॅन्सर झालाय, हे मी सुरुवातीला स्वीकारायलाच तयार नव्हते. मी घरी जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी झोपेतून उठले, तेव्हा काहीच बदललं नव्हतं. माझ्या पतीने त्यावेळी काही जलद निर्णय घेतले आणि पुढच्या दोन दिवसांत आम्ही परदेशात उपचारासाठी गेलो. माझा मुलगा त्यावेळी माझ्यासोबत नव्हता, म्हणून मी पतीशी भांडत होते. मला थोडा वेळ द्यायला पाहिजे होतं, अशी माझी अपेक्षा होती. पण मी इतर कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त उपचारावर लक्ष केंद्रीत करावं, असं त्याचं म्हणणं होतं.”
सोनालीला चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या वाचण्याची केवळ 30 टक्के शक्यता असल्याचं सांगितलं होतं. “डॉक्टरच असं कसं म्हणू शकतात, असा सवाल मी त्यांना केला. मी त्यांना सतत हेच विचारत होती की हे कसं शक्य आहे? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसता, तेव्हा तुम्ही तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीवर तो राग काढता. त्यावेळी मी डॉक्टरांवर तो राग काढत होते. पण आता मागे वळून पाहिल्यावर मला समजतंय की ते फक्त सत्य सांगत होते आणि कोणतीच गोष्ट सत्याला बदलू शकत नाही.”