yuva MAharashtra क्रॉस चेकमध्येही आहेत प्रकार, तुम्ही चेक देताना या गोष्टी तर विसरत नाहीत ना ?

क्रॉस चेकमध्येही आहेत प्रकार, तुम्ही चेक देताना या गोष्टी तर विसरत नाहीत ना ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
बँक अकाउंट उघडलं की त्याबरोबर एटीएम कार्ड व चेकबुक, डेबिट कार्ड यासारख्या गोष्टी मिळतात. चेकबूक प्रत्येक बँक अकाउंट होल्डर वापरतोच असं नाही कारण चेकचं काम खूप कमी वेळा असतं. पण जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी चेक वापरले असतात. जेव्हा चेकद्वारे पेमेंट केलं जातं तेव्हा त्यावर प्राप्तकर्त्याचे नाव, बँक डिटेल्स, किती रक्कम ट्रान्सफर केली जातेय ती माहिती लिहून त्यावर सही केली जाते. आज आपण चेकवरील रेषा व त्याचे अर्थ जाणून घेणार आहोत.

तुम्ही चेकच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात मारलेल्या दोन रेषा कधीतरी पाहिल्या असतील. कधीतरी कदाचित तुम्हीही असं केलं असेल, पण त्याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. निघोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ॲक्ट 1881 च्या सेक्शन 123 अंतर्गत, चेकच्या लेफ्ट कॉर्नरवर मारलेल्या दोन रेषांच्या माध्यमातून चेक देणारा बँकेला हे सांगतो की हा 'क्रॉस चेक' आहे. या चेकची खास गोष्ट म्हणजे तो देऊन तुम्ही कोणत्याही बँकेतून कॅश काढू शकत नाही.


फक्त अकाउंटमध्ये होतं पेमेंट

कोणत्याही चेकला क्रॉस केल्यास त्याचा अर्थ असा होतो की त्या चेकद्वारे फक्त बँक अकाउंटमध्ये पेमेंट होऊ शकतं. हे पेमेंट त्याच व्यक्तीला केलं जाईल, ज्याचं नाव चेकवर लिहिलं असेल. याशिवाय ज्याच्या नावावर हा चेक आहे, ती व्यक्ती चेक एंडोर्स करू शकते, पण त्यासाठी तिला त्या चेकच्या मागे सही करणं गरजेचं असतं.

जनरल क्रॉसिंग

क्रॉस चेक अनेक प्रकारचे असतात. पहिलं जनरल क्रॉसिंग आहे, ज्यामध्ये चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन रेषा मारल्या जातात.

स्पेशल क्रॉसिंग

स्पेशल क्रॉसिंग तेव्हा केलं जातं, जेव्हा चेक देणाऱ्याला वाटतं की ज्या व्यक्तीला तो पैसे देत आहे, ते पैसे तिच्या किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही खास व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जायला हवेत.

अकाउंट पेई क्रॉसिंग

जर चेकवर क्रॉसिंग लाइन्सच्या मधोमध अकाउंट पेयी (A/C Payee) असं लिहिलं तर याचा अर्थ असा होतो की, या चेकवर नाव असलेल्या व्यक्तीच्याच अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात. अकाउंट पेई चेक इतर कोणत्याही व्यक्तीला कॅश करता येत नाही.