| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ मे २०२४
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या 15 दिवसांत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ऐन निवडणूक काळात त्यांनी अनेक गौप्यस्फोट करीत नेतेमंडळींना अडचणीत आणले आहे. त्यांच्या गौप्यस्फोटातून अनेक नेतेमंडळींना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे त्यांनी नेमके अशास्वरूपाचे विधान करून काय साध्य केले, हे समजून येत नाही. त्यांच्या या विधानामुळे वंचितचा प्रभाव कमी झाला असल्याचे जाणवत आहे.
लोकसभा निवडणुकीत माविआसोबत आघाडी करून प्रकाश आंबेडकरांना दोन ते तीन जागी विजय मिळवता आला असता. मात्र, ही हातात आलेली संधी त्यांनी घालवली आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटप करताना विनाकारण अडून राहिले. त्यामुळे त्यांच्या हातात असलेल्या जागेवरही विजय मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे निवडणुकीचे जवळपास दोन ते तीन टप्पे झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी चर्चेत राहून लक्ष वेधून घेण्यासाठी सातत्याने विधाने करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
या त्यांच्या विधानामागचा उद्देश केवळ युती-आघाडीत खळबळ उडवून देणे, हाच असल्याचे जाणवत आहे. ऐन निवडणूक काळात गौप्यस्फोट करीत माध्यमाचा फोकस वळविण्याचा प्रयत्न त्यांचा दिसत आहे. विशेषतः असे वक्तव्य करीत गेल्या काही दिवसापासून मरगळ आलेल्या पक्ष संघटनेत जाण आणणे, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य ते करीत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक काळात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये पाहिल्यांदा आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला होता. त्यामुळेच आमची जागावाटपाची चर्चा फिसकटली, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे जनतेत शिवसेनेबाबत मोठा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर शिवसेनेकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नाही.
त्यावेळी आमचा पाच जागेंचा प्रस्ताव होता, असे प्रसार माध्यमे सांगत होती. मात्र, आम्ही ज्या वेळी अटी टाकल्या त्यावेळी भाजपसोबत न जाण्याची अट होती. त्यावेळी राऊतांनी सांगितले आम्ही तसे काही लेखी लिहून देऊ शकणार नाही, आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाही. त्यामुळेच माविआचे जागावाटप रखडले होते व पुढे आम्ही चर्चा केली नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी गौप्यस्फोट करताना 4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवारही भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हा दावा करतानाच त्यांनी काही कारणंही दिली आहेत. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबाबतचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाचव्या टप्प्याच्या मतदानाला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्याआधीच आंबेडकर यांनी बार उडवून दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राज्यातील परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला? शरद पवारही भाजपसोबत जातील. शरद पवार यांची काहीही गॅरंटी देता येत नाही. ते इथे राहतील याची गॅरंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील. दोघेही जातील. यात नवीन काहीच नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात, असे सांगितले. त्यामुळे त्यांच्या या विधानाने राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची अडचण झाली. त्याचवेळी भाजपला टार्गेट करताना त्यांनी राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भाजपने भविष्याचा गेम प्लॅन केला असल्याचे सांगत आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली होती.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरशीचा सामना होत असताना याठिकाणी अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली. त्यांचे विधान एकदम चर्चेत आले. उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार शड्डू ठोकून आहेत. येथे एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
त्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी नितीन गडकरींभोवती मोठा कट रचला जात असल्याचा दावा केला. भाजपला नितीन गडकरींना राजकारणातून निवृत्त करायचंय पण गडकरी मागे हटायला तयार नाहीत.. म्हणून नितीन गडकरींच्या जवळच्या अधिकाऱ्यांचे अटकसत्र घडवून आणून भाजप त्यांना बदनाम करत असल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
बारामतीमध्ये उमेदवार न देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नव्हती. पण, सुप्रिया सुळे या मला भेटल्या होत्या. तसेच कोल्हापूरमध्ये शाहु महाराजांना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मला म्हणाले, की आमची लढाई मोठी आहे. आमच्या बाजूने तुम्ही आहात, असे दाखवा. त्यामुळे बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. आंबेडकर यावेळी म्हणाले, अहमदनगरमधील भाजपचे मंत्री असलेले नेते मल्लिकार्जुन खरगे यांची गुप्त भेट घेत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात हे नेते गाफील राहत आहेत, असा आरोप केला होता. त्यामुळे नगरच्या राजकारणात खळबळ पाहावयास मिळाली.
त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी एक दावा करत महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आंबेडकर म्हणाले. त्यांनी सोलापूरच्या एका सभेत हा गौप्यस्फोट केला. इतकंच नाही तर महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे या देखील निवडणुकीनंतर भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.
या सर्व प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन निवडणूक काळात त्यांनी गौप्यस्फोट करीत माध्यमांचा फोकस त्यांनी वळवला आहे. विशेषतः असे वक्तव्य करीत पक्ष संघटनेत जाण आणणे, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्ये केली नसावीत का ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.