yuva MAharashtra काठावर पास होणाऱ्या मुलांची सांगलीत मिरवणूक, आव्हान स्वीकारुन मिळविले चांगले यश !

काठावर पास होणाऱ्या मुलांची सांगलीत मिरवणूक, आव्हान स्वीकारुन मिळविले चांगले यश !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२४
काबाडकष्ट करुन कसाबसा संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच खडतर असतो. शैक्षणिक वातावरणापासून दूर असलेल्या व सतत काठावर पास होणाऱ्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा बहर फुलविणारा एक उपक्रम सांगलीत राबविण्यात आला. चांगले गुण मिळविले तर गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्याचे चॅलेंज या मुलांनी स्वीकारले अन् ते यशस्वी केले. सोमवारी दहावीचा निकाल लागताच या गरिबाघरच्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली.

कुपवाड ते बुधगाव रस्त्यावर वसलेल्या बाळकृष्ण नगरमधील मुलांच्या यशाची कहाणी सध्या चर्चेत आहे. भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. नितीन नायक या उपक्रमाचे नायक ठरले आहेत. परिसरात हातावरचे पोट असलेली लोकवस्ती अधिक आहे. घरातले पुरुष व महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते. मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉ. नायक यांच्या लक्षात आली. त्यांनी या मुलांशी संवाद साधला. कधी मस्करीत तर कधी उपदेशाचे डोस पाजून त्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रगतीशील वाटेवरुन चालण्यास शिकविले.

काठावर पास होणाऱ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविले, तर त्यांची गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढू, अशी पैज डॉ. नायक यांनी लावली. मुलांनी पैजेचा विडा उचलला. आव्हानाप्रमाणे अभ्यासात मुले गुंतली. सोमवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नायक यांना या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला. मुलांनी ५० ते ९१ टक्क्यांपर्यंत मजल मारली. नायक यांच्या उपक्रमाला यश मिळाल्याने त्यांनी आनंदाने मिरवणूक काढली.


दऱ्याबाच्या चेहऱ्यावर फुलले हसू

प्रातिनिधिक स्वरुपात दऱ्याबा देवकते या ५१ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक काढण्यात आली. डोईवर घेत पुष्पहार घालून, गुलालाची उधळण करीत घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली. दऱ्याबाच्या चेहऱ्यावर यामुळे हसू फुलले.

या मुलांनी जिंकली पैज

यशस्वी झालेल्या मुलांमध्ये शिवम मारनोर (९१ टक्के), अविनाश काळे (८०), राम माने (६७), स्वप्निल माने (६०), धनश्री कटरे (५६), दऱ्याबा देवकते (५१), आदर्श शिंदे (४५) व अनिकेत माने (३५) यांचा समावेश आहे.