yuva MAharashtra लेकासाठी संसार सोडला, आज अनेक विशेष मुलांसाठी ती बनली आहे हक्काचा आधार !

लेकासाठी संसार सोडला, आज अनेक विशेष मुलांसाठी ती बनली आहे हक्काचा आधार !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ मे २०२४
आदिती शार्दूल. छत्रपती संभाजीनगरच्या एका सुखवस्तू कुटूंबातली लाडाची लेक. शिक्षण, लग्न असे टप्पे जसे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, तसेच त्यांच्याही आयुष्यात आहे. लग्नानंतर आई होणार असल्याची चाहूल लागली आणि आनंदाला आणखीनच बहर आला. पुढच्या काही महिन्यांतच गोड- गोजिऱ्या 'हर्ष'चा जन्म झाला. सुरुवातीला दोघं पती- पत्नी लेकाचं कौतुक करण्यात दंग झालेले होते. पण जसा हर्ष मोठा होत होता, तसं तसं काहीतरी खटकत गेलं..

तो साधारण दिड ते दोन वर्षांचा झाला तेव्हा त्यांना असं समजलं की हर्ष हा स्पेशल चाइल्ड असून त्याचं हे दिव्यांगत्व त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. हा त्या दोघांसाठीही मोठाच मानसिक धक्का होता. त्यांचं दिव्यांग असणं, स्वीकारणं सुरुवातीला दोघांनाही कठीण होतं. पुढे पतीनेही त्यांची साथ सोडली. संसार की विशेष मुलाची देखभाल आणि त्याचे भवितव्य असे दोन पर्याय होते. पण आईच्या मायेनं लेकाचा विचार केला.


मुलासाठी त्यांनी नवरा, संसार या गोष्टी मागे सोडून दिल्या आणि स्वत:च्या लेकासाठीच नाही तर इतर अनेक लेकरांसाठीही त्यांनी एक उमेदीचे केंद्र तयार केले आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेची जबाबदारी हातात घेतली. स्वत: आई म्हणून त्या अनुभवातून गेल्यामुळे विशेष मुलांच्या आईच्या अडचणी, त्यांच्या संगोपनात येणारे अडथळे त्या खूप चांगल्या समजून घेऊ शकल्या. अनेक मातांना मार्गदर्शन करू शकल्या. आज त्यांनी त्या शाळेत अनेक बदल केले असून विशेष मुलांच्या दृष्टीने ती अत्याधुनिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या आणि शाळेच्या माध्यमातून आज हर्षसारख्या अनेक मुलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यांचे आईपण विस्तारत अनेकांसाठी मायेचा आधार बनले आहे.