मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक रोजगारासाठी येतात. ते मुंबईकर होऊन जातात. त्यामुळे मुंबईतल्या घडामोडींचे परिणाम देशभर ऐकायला मिळतात. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबईत भाजपाप्रणीत महायुती की काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेले आहे. सन २०१४ आणि सन २०१९ मध्ये भाजपाप्रणीत एनडीएने सहापैकी सहा लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा मुंबईचा कल काय आहे यावरून राजकीय वर्तुळात माहोल गरम आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. मुंबईतील सहा मतदारसंघांसह १३ मतदारसंघांत कोण जिंकणार यापेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक कशी राहिली, यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्यात १३ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले. त्यात दक्षिण मुंबईत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईत ४७.७० टक्के मतदान झाले. दक्षिण मुंबईत २०१९च्या तुलनेत यावेळी चार टक्के मतदान कमी असल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे. अनेक सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक, सदस्य शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने मतदानाच्या दिवशी मुंबईबाहेर फिरायला गेले असल्याचे दिसून आले. मुंबईत बॉलिवूड स्टार शाहरूख खान, क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर यांनी मतदान करत, बोटाच्या शाईची खूण दाखवत, मुंबईकरांनाही मतदानासाठी आवाहन केले. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यावेळी मतदानाचा टक्का वाढला नाही. याबाबत मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री यांची सोशल मीडियावरील दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. केंद्र सरकारने मतदान करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अर्थात कायदा करावा असे परखड मत पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले आहे.
“लोकसभा निवडणुकीमध्ये देशाच्या पंतप्रधानपदी कोणाला विराजमान करणार यासाठी तुमचे प्रत्येक मत महत्त्वाचे असते. माझ्या देशातील प्रगती कशी असावी, त्यासाठी कोण काम करू शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. विदेशात जर मतदान केले नाही, तर सरकारी सवलती आणि योजनांपासून तुम्ही वंचित राहता. विदेशात मोठ्या प्रमाणावर १००% मतदान होत असते. तशा प्रकारे भारतात निर्णय केला पाहिजे. तसा कायदा केला पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मतदानाच्या दिवशी मौजमजेसाठी कुटुंबासह जाणे हा ट्रेंड वाढत चालला आहे. राष्ट्रीय कर्तव्याची भावना मुंबईकरांनी बाळगायला हवी, हे खरे तर सांगण्याची गरज नाही.
दुसरा मुद्दा निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो मुंबईकरांना मतदानापासून वंचित राहावे लागले, अशा तक्रारींची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागत असल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांकडे वेगवेगळे ॲॅप्स होते. ज्यामध्ये मतदारांची नावे लगेचच मिळत होती. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लिस्टमध्ये नाव शोधण्याची वेळ आली होती. यातच वेळ वाया जात असल्याचे पाहायला मिळाले. उन्हामुळे प्रचंड त्रास जाणवत होता. नियोजन अतिशय ढिसाळ होते. साधी पाणी पिण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोर जावे लागले. अनेकांनी लांबच लांब रांगा पाहून मतदान न करणे पसंत केले.
ढिसाळ नियोजनामुळे अनेक मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू होते. मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपून गेल्यावरही रांगा होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी, संताप आणि गोंधळाचे वातावरण होते. मुंबईतील विलेपार्ले, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील बिंबीसारनगर, बोरिवली, दहिसरसह अनेक भागांत मतदानाला विलंब झाल्याची तक्रार मतदारांनी केली. मतदानाला विलंब होत असल्याने काही जण मतदान न करताच निघून गेले. तर काहींनी तासनतास उभे राहून मतदान केले. आयोगाच्या ढिसाळ नियोजनावर मतदारांनी संताप व्यक्त केला. नाशिकमध्ये मतदान केंद्रावर मोबाइल बंदी केल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करीत उपस्थित पोलिसांशी वाद घातला. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर काहीजण मतदान न करताच माघारी फिरले. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदार केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई असल्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचली नाही.
अनेक मतदार मोबाइल घेऊन मतदान केंद्रावर आले होते. मात्र पोलिसांनी मोबाइल मतदान केंद्रात नेण्यासाठी मज्जाव केल्याने मोबाइल कुठे ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाल्याने मतदारांनी मोबाइलसाठी मतदान न करता माघारी फिरले, अशा असंख्य मतदारांच्या तक्रारी आहेत.मात्र जे सहपरिवार मतदान करण्यासाठी आले, त्यांनी एकमेकांचे मोबाइल सांभाळून मतदानाचा हक्क बजावला, तर अनेकांनी मोबाइल सायलेंट किंवा बंद करून मतदान केले. एकमेकांचे मोबाइल सांभाळण्यात दोन तास वाया गेल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून ऐकायला मिळाली. नाशिकसह मुंबईमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमान होते. अशाच मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. मतदान करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागत होता. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना बराच वेळ उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे खूप त्रास झाला. यापुढे निवडणूक आयोगाने मतदारांची गैरसोय होणार नाही याचा भविष्यात यातून बोध घ्यायला हवा.