yuva MAharashtra विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ

विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२४
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातील शिंदेसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील हे युतीसोबत, तर समर्थक कार्यकर्ते बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.

दोन्ही गटांतील काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांची बंडखोर विशाल पाटील यांच्यासोबत तासगाव रस्त्यावरील माजी नगरसेवक महेशदाजी कदम यांच्या बंगल्यात मंगळवारी रात्री बैठक झाली. विटा येथील बाबर व पाटील या दोन्ही प्रमुख गटांचे नेते महायुतीसोबत आहेत. त्यामुळे सुहास बाबर व वैभव पाटील हे महायुतीचे उमेदवार व खासदार संजय पाटील यांच्या प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत.

परंतु, त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील हे मंगळवारी विटा परिसरातील गावांच्या दौऱ्यावर होते. या वेळी विशाल पाटील यांनी पाटील व बाबर गटातील प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काही माजी नगरसेवक व विशाल पाटील यांची रात्री एकत्र बैठक झाली.

नेते नाही, पण कार्यकर्त्यांची बंडखोरी..

विट्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. सचिन जाधव, ॲड. धर्मेश पाटील, माजी नगरसेवक ॲड. विजय जाधव, महेशदाजी कदम, संजय तारळेकर, ॲड. भालचंद्र कांबळे, संजय कांबळे, राहुल कांबळे, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, रुद्राप्पा साबळे, अनिल निंबाळकर, राजू भोसले, सुधीर भंडारे, रामभाऊ दांडेकर, मंगेश चौगुले व गणेश चौगुले आदी पाटील व बाबर या दोन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.