yuva MAharashtra गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली !

गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली !



| सांगली समाचार वृत्त |
कोट्टायम - दि. २७ मे २०२४
गुगल मॅपच्या माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत बुडाली. त्यामुळे गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडला असं म्हणायला हवं.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दक्षिण केरळातील कुरुप्पनथारा इथं चार पर्यटकांनी एका जागेवरुन दुसरीकडे जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला, हे सर्व प्रवासी हैदराबादवरुन केरळमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्याच वेळी कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात शनिवारी सकाळी त्यांची कार नदीत पडली. सदर प्रवासी गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यानुसार पुढे पुढे जात होते. ज्या रस्त्यावरुन ते प्रवास करत होते, त्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलं होतं. तरीही ते गुगल मॅपच्या विश्वासावरून पुढे पुढे सरकत होते. त्याच वेळी समोर नदी असल्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि कार सहित सर्वजण नदीत बुडाले.


सुरुवातीला रस्त्यावर पाणी जास्त असल्याचं चालकाला वाटलं, पण कार पाण्यात आणखी खोल जाऊ लागल्यानंतर कारमधले सर्वाना आपण बुडत असल्याची जाणीव झाली. यानंतर कारच्या काचा उघडल्या आणि चारही जणांनी खिडकीतून बाहेर पाण्यात उड्या मारल्या. कार नदीत पडल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे काय होऊ शकतो याचा अंदाज मात्र यावेळी पाहायला मिळाला. यापूर्वी सुद्धा गुगल मॅप मधील त्रुटी समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने दोन डॉक्टरांचा नदीत पडून मृत्यू झाला होता