Sangli Samachar

The Janshakti News

बीएसएनएल कंपनी संकटात ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ मे २०२४
बीएसएनएल (BSNL) ही भारतीय दूरसंचार कंपनी सध्या संकटात आली असून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. तसा दावा बीएसएनएल एम्प्लॉईज यूनियनने केला आहे. या यूनिययनने केंद्र सरकारला थेट पत्र लिहून सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधण्याची विनंती केली आहे. 

शासकीय दूरसंचार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या यूनियनने 4 मे रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात यूनियनने अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. गेल्या काही काळात अनेक कंपनीच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, असा दावा या यूनियनने आपल्या पत्रात केला आहे. बीएसएनएलकडून हायस्पीड डेटा पुरवला जात नाही, याच कारणामुळे ग्राहक दुसऱ्या कंपनीचा डेटा वापरतायत, असा दावा, या पत्रात करण्यात आलाय. 

ग्राहक कमी होण्यामागचं कारण काय?

बीएसएनलच्या ग्राहकांची संख्या कमी होण्यासाठी टीसीएस कारणीभूत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांच्या यूनियनने केला आहे. बीएसएनएल 4 जी सेवा देण्यावर काम करते आहे. सध्याच्या स्पर्धायुगात कंपनीला टिकून राहायचे असेल तर हायस्पीड डेटा सर्व्हिसवर काम करणे गरजेचे आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडीया यासारख्या कंपन्या सध्या ग्राहकांना हायस्पीड 5 जी डेटा देत आहेत. बीएसएनएलकडे मात्र अजूनही 4 जी सेवाच आहे. याच कारणामुळे ग्राहक बीएसएनएल कंपनी सोडून अन्य कंपन्यांचे इटरनेट वापरत आहेत 


युनियनकडून टीसीएसवर आरोप

बीएसएनएल एम्प्लॉइज यूनियनच्या म्हणण्यानुसार बीएसएनएलच्या 4जी सेवांना टीसीएसमुळे उशीर होत आहे. 4 जी सेवा पुरवण्यासाठी ज्या उपकरणांची गरज लागते, ते पुरवण्यासाठी टीसीएसला ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र हे उपकरणं देण्यासाठी टीसीएसकडून उशीर होत आहे. यूनियनच्या म्हणण्यानुसार टीसीएस कंपनीने 4जी उपकरणांचे फील्ड ट्रायलदेखील पूर्ण केलेले नाही. 

गेल्या आर्थिक वर्षात कोट्यवधी ग्राहक झाले कमी 

यूनियनने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात बीएसएनलचे ग्राहक कमी झाल्याचा दावा केलाय. गेल्या वित्तीय वर्षात बीएसएनएलचे साधारण 1.8 कोटी ग्राहर कमी झाले आहेत. यातील 23 लाख ग्राहक हे एकट्या मार्च महिन्यात कमी झाले आहेत. यावरून बीएसएनएल ही कंपनी सध्या संकटात सापडली असून तिची स्थिती गंभीर आहे, असा दावा केला जातोय.