yuva MAharashtra बारावीतील जुळ्या बहिणींचं 'जुळ' यश !

बारावीतील जुळ्या बहिणींचं 'जुळ' यश !



| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २३ मे २०२४
पंढरपूरमधील केबीपी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी सिद्धी व रिद्धी संतोष रोपळकर या जुळ्या बहिणींनी बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे.सिद्धी रोपळकर हिने ९२.१७ टक्के, तर रिद्धीने ९१.८३ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोन्ही जुळ्या बहिणींनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करीत अनोखे जुळे यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंढरीतील बांधकाम व्यावसायिक व सिव्हिल इंजिनिअर संतोष रोपळकर यांना सिद्धी व रिद्धी या दोन जुळ्या मुली आहेत. कुशाग्र बुद्धीच्या या दोन्ही जुळ्या बहिणी शालेय जीवनापासूनच अभ्यासामध्ये प्रगतीपथावर आहेत. विशेष बाब म्हणजे, दहावीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत देखील दोघींनी घवघवीत यश संपादन केले होते.

दहावीला येथील कवठेकर प्रशाले मधून सिद्धी व रिद्धी या दोघींनी ९८.६० टक्के एकसारखे गुणप्राप्त करीत पंढरपूरमध्ये दोघींनी पहिला येण्याचा मान पटकावत जुळे यश संपादन केले होते. दहावीच्या संस्कृत या विषयांमध्ये दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले होते. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील या दोघीं जुळ्या बहिणींनी केबीपी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय येण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय बारावीला गणित विषयामध्ये देखील दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

रिद्धी व सिद्धी या दोघींनाही आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जेईई मेन परीक्षेमध्ये दोघींनी उत्तम यश संपादन केले असून त्या आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल या दोघींचे सर्वत्र कौतुक होत आहे.