| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२४
मातंग समाज समन्वय समिती व मातंग समाजातील विविध संघटनाच्यावतीने सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी राम कांबळे, आकाश तिवडे, शेवंता वाघमारे, श्रीपाद सावंत, लक्ष्मण मोरे, विजय आवळे, संजय कांबळे, शीतल लोंढे, कपील आवळे, सतीश मोहिते, चंद्रकांत भंडारे, तानाजी आवळे, अशोक मासाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. देशात आरक्षण व संविधानाविरोधी वातावरण तयार झाले आहे. भाजपचे खासदार संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी मातंग समाजाने विशालदादा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडविण्यासाठी विशालदादांनी प्रयत्न करावेत. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करावा. सांगली, मिरजेसह तालुक्याच्या ठिकाणी आण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्यासाठी मदत करावी. प्रत्येक मातंग वस्तीत आण्णाभाऊंच्या नावे सभागृह उभारावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मातंग समाजाला न्याय द्यावा, दफनभूमी, स्मशानभूमीचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षाही समन्वय समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील, उदय पवार, पी. एल. रजपूत आदि उपस्थित होते.