| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
मुंबई सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारी दुसरी तुळई बुधवारी पहाटे स्थापन करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. पहाटे ३ वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी पूर्ण झाली. या मोहिमेनंतर सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू परस्परांना जोडण्याच्या कामाला वेग येणार आहे.
महानगरपालिकेने सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू परस्परांना जोडणारी बहुप्रतिक्षित पहिली तुळई जोडण्याचा आव्हानात्मक टप्पा २६ एप्रिल रोजी पहाटे पार केला. त्यांनतर, मुंबईकरांना दुसऱ्या तुळईच्या जोडणीची प्रतीक्षा लागली होती. पहिल्या तुळईला लागूनच काही अंतरावर दुसरी तुळई सांधण्यात येणार असल्याने हे काम प्रचंड आव्हानात्मक होते. अखेर महानगरपालिकेने भरती – ओहोटीचा अंदाज घेऊन बुधवारी पहाटे दुसरीही तुळई यशस्वीरीत्या सांधण्याची मोहीम फत्ते केली. पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर दुसरी तुळई बसविण्यात आली आहे. दुसरी तुळई नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. तुळईच्या स्थापनेदरम्यान वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच, पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्तेचे गंजविरोधक रंगकाम करण्यात आले आहे. या तुळईचे वजन अडीच हजार मेट्रीक टन असून लांबी १४३ मीटर आहे. तसेच, ३१.७ मीटर रुंद आणि ३१ मीटर उंच असे या तुळईचे आकारमान आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.
या कामगिरी दरम्यान, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, उपआयुक्त चक्रधर कांडलकर, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम, मांतय्या स्वामी, 'एचसीसी'चे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते. या मोहिमेनंतर लकवकरच उर्वरित कामे पूर्ण करून मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.