| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ मे २०२४
वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढल्यानंतर मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे.
एकीकडे अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा तर आनंदराज आंबेडकर यांचा ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रकाश शेंडगेंना पाठिंबा अशी परिस्थिती आता तयार झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगलीतून अपक्ष उभे असलेल्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गातून वंचितचे उमेदवार काका जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश शेंडगेंना पाठिंबा
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगेंचा पाठिंबा वंचितनं काढला. विशाल पाटील अपक्ष अभे राहिल्यास पाठिंबा जाहीर करु, असं याआधी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं, त्यानुसार त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहिर केला. आता प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला आहे.
वंचितनं पाठिंबा काढल्यावर शेंडगेंची नाराजी
वंचितने पाठिंबा काढल्यावर ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याचं कळलं. आश्चर्य वाटलं नाही, कारण चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादा पाटील यांचे नातू असलेल्या विशाल पाटील जे वंचित आहेत त्यांना पाठिंबा दिलाय. वंचितनं बहुदा वंचितची व्याख्या बदललेली असावी, कदाचित विशाल पाटील हे वंचित झाले असतील, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला असेल, असं मला वाटतं.
हे गणित न समजण्यापलिकडचे
प्रकाश शेंडगे म्हणाले होते की, बारामतीत देखील चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे. वंचितांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली पार्टी प्रस्थापित पक्षातील लोकांना पाठिंबा देत आहे, हे गणित न समजण्यापलिकडचे आहे. अकोल्यातून आम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी मला सांगलीतून पाठिंबा दिला. आम्ही आमच्या शब्दावर शेवटपर्यंत कायम राहिलो, त्यांनी का शब्द पाळला नाही, याचं उत्तर त्यांच्याकडूनच घ्यायला पाहिजे. विशाल पाटील आणि सुप्रिया सुळे आरक्षणवादी कधीपासून झाले, असा सवालही शेंडगेंनी यावेळी उपस्थित केला होता.