| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ मे २०२४
आगामी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बारावी झाल्यानंतर आता पदवी तीन वर्षांची नसून चार वर्षांची असणार आहे. मात्र दोन वर्षानंतर शिक्षण सोडल्यास डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. या नवीन धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्यात आला आहे. मात्र काही कारणांनी विद्यार्थ्यांना अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागले तर त्याचे नुकसान होणार नाही.
पदवीच्या पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास त्याचे वेगळे प्रमाणपत्र मिळेल. दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळेल. तर तिसरे वर्ष पूर्ण केल्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल. चौथे वर्ष पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्याला ऑनर्स (थेरोटीकल) किंवा रिसर्च (संशोधन) पदवी मिळणार आहे.
चार वर्षांची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळेल. तीन अथवा चार वर्षांची पदवी पूर्ण करून पदव्युत्तर पदवीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात रिसर्च मेथडॉलॉजी, दुसऱ्या सत्रात जॉब ऑन ट्रेनिंग असे विषय असतील. त्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट आणि चौथ्या सत्रात लघु शोधनिबंध बंधनकारक असेल. हा लघुशोधनिबंध पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याचे पद्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होईल.दरम्यान, डीएड, बीएड अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे.