yuva MAharashtra भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने जैन धर्माने समृद्ध केली : श्रीमंत कोकाटे

भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने जैन धर्माने समृद्ध केली : श्रीमंत कोकाटे



| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १ मे २०२४
भारतीय संस्कृतीला जैन धर्माने फार मोठी देणगी दिली असून भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने जैन धर्म आणि तत्व विचाराने समृद्ध झाली आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून जैन धर्माचे तत्वज्ञान चालत आले आहे. भगवान वृषभनाथांचा कालखंड हा ताम्र पाषाणयुगातला असून सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये त्याचे अवशेष सापडले आहेत. भ.वृषभनाथांनी जगाला असि, मसि आणि कृषीची देणगी दिली. भ. महावीर आणि बुद्ध या दोघांनी नास्तिक आणि निरीश्वरवादी तत्त्वज्ञान मांडले. वैदिक परंपरेतील यज्ञ हिंसेला विरोध आणि कृषी संस्कृतीची भरभराट या दोन धर्मामुळे झाली. भगवान पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म विकसित करून भगवान महावीरांनी विश्वाच्या कल्याणासाठी पाच तत्वे सांगितली. जैन परंपरेचे अनुयायी असणारी अनेक राज्य घराणे वंश आणि राजे होऊन गेले. त्यांनी या देशांमध्ये सहिष्णुता आणि सर्वधर्म समतेचे राज्य केले. वर्तमान काळातही अण्णासाहेब लठ्ठे यांच्यापासून कर्मवीरांच्या पर्यंत तसेच वैद्यकीय क्षेत्रात जैन धर्माचे योगदान आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहे.


जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या 
शतकोत्तर रौप्य महोत्सवी दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगती आणि जीनविजयच्या 119 व्या वर्धापन दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानी द.भा.जैन सभेचे मुख्यमहामंत्री व प्रकाशक डॉ.अजित पाटील होते. यावेळी व्यासपीठावर सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील, एक्झि.ट्रस्टी राजेंद्र झेले, महामंत्री दादासाहेब पाटील (चिंचवाडकर) उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, पहिल्यांदा स्त्रीयांना श्राविकांना समानतेचा हक्क, ब्राह्मी व प्राकृत या भाषांची देणगी, समग्‌‍ज्ञान, समग्‌‍दर्शन, सम्यग्‌‍चारित्र्यादी जैन धर्माने जगाला दिली. समानतेच्या त्तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेल्या या धर्माने ‌‘अहिंसा परमो धर्म:', ‌‘क्षमावली' ही तत्त्वे दिली. या तत्त्वाचा अंगिकार केला तर जगात कधीच युध्दे होणार नाहीत. विविध कला, संस्कृतीची देणगी, अनेक लेणी ही जैन संस्कृतीची देण आहे. मराठीतला इ.स.दहाव्या शतकातला पहिला शिलालेख श्रवणबेळगोळ येथे भ.गोमटेश्वरांच्या पायथ्याशी कोरलेला आढळतो. कन्नड आणि तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने कधीच दिला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा असेल तर जैन पुरावेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देतील. मराठी भाषेची वृध्दी, संवर्धन, लौकिक आणि सन्मान वाढविणे किंवा मराठी भाषेचा पाया रचण्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान जैन धर्माचे आहे हे विसरून चालणार नाही. 
सुरूवातीला प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सहसंपादक आर्कि. प्रमोद चौगुले यांनी स्वागतामध्ये समाजाचे प्रतिबिंब म्हणून कार्यरत असलेल्या ‌‘प्रगति'च्या वाचनाकडे आजची तरुणपिढी आकर्षित कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविकामध्ये ‌‘प्रगति' चे मुख्य संपादक डॉ. महावीर अक्कोळे यांनी मुखपत्राच्या एकूण कार्याचा आढावा घेवून अलीकडे जैन पत्रकारितेमधील आलेल्या निष्क्रीयतेबद्दल चिंता व्यक्त केली. प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहसंपादिका सौ.नीलम माणगावे यांनी आभार मानले. प्रा.सौ. अंजना चावरे व प्रा.श्री.सुनिल चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
माजी संपादक प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा.डी.ए.पाटील, डॉ.बी.ए.शिखरे, पा.पा.पाटील, राजेंद्र नांद्रेकर, एस.डी.अकोळे, बी.बी.शेंडगे, डॉ. सुरेश पाटील, सुरेखा पाटील, धनचंद्र सकळे, सी.ए.भाऊसोा नाईक, मराठा सेवा संघाचे महाडीक, ॲड. इंद्रजित कांबळे, प्रा.सचिन पाटील, विजयकुमार बेळंके, विक्रांत नाईक, जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राध्यापक जयसिंगपूर परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.