yuva MAharashtra लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्यांचा व्याजासह हिशोब चुकता करणार - खा. संजय पाटील

लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्यांचा व्याजासह हिशोब चुकता करणार - खा. संजय पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
लोकसभा निवडणुकीत रंग दाखविणाऱ्या नेत्यांचा व्याजासाहित हिशेब चुकता करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला. लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच खा.पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गत तीन महिन्यापूर्वी भाजप कोअर समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती. मात्र कोअर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखविला. त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबाबत प्रथमपासूनच शंका होती, ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली. त्यामुळे आपण या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही.


मात्र भाजपसह महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक अन बाहेर एक असा प्रचार केला. या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं अन आताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते, याची संपूर्ण कल्पना आली होती. या सर्व शक्यता गृहीत धरुनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो. विरोधी उमेदवारही अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करण्यात व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीसा यशस्वी ठरला. तरीही सर्वसामान्य मतदाराच्या पाठबळावर एक लाखाहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावाही खा. पाटील यांनी केला. भाजप नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या त्या ऑडिओ क्लिपची शहानिशा केली जाईल, त्यात तथ्य आढळल्यास तसा अहवाल भाजप प्रदेश समितीकडे पाठविला जाईल, असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी सांगितले.