yuva MAharashtra तरच शरद पवारांशी जुळवून घेऊ, निकालापूर्वी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !

तरच शरद पवारांशी जुळवून घेऊ, निकालापूर्वी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २६ मे २०२४
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, असं बोललं जातं. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून हेच स्पष्ट झालंय. जुलै 2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेलेही पाहायला मिळाले. त्यानंतर बारामती लोकसभेची लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये झाली. मात्र, पडद्यामागील खरी लढत काका-पुतण्यांमध्येच होती, असंही बोललं गेलं. दरम्यान, पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार (SharadPawar) एकत्र पाहायला मिळतील का? याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे. आता थेट अजित पवारांनीच याबाबत भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

"आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे, ती इतरांना योग्य वाटली तर त्याठिकाणी पुढे काही होऊ शकतं. आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतलीये, ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली. तर त्याच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल", असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


शरद पवार अजित पवारांबद्दल काय म्हणाले होते ?

अजितचा स्वभाव मला माहितीये, तो कधीही कोणापुढे हात पसरवत नाही, असंही काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे विधानसभेपूर्वी किंवा त्यानंतर पवार काका पुतण्यांमध्ये दिलजमाई होणार का? असा सवाल विचारला जातोय. दरम्यान, अजित पवारांनी कायम शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं आहे. वडिल मुलगा मोठा झाला की त्याच्या हाती कारभार देतात. आता तुमचं वय 84 झालंय, आता तुम्ही माझ्या हातात सर्व कारभार द्या, असंही अजित पवार एका सभेत म्हणाले होते.