| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२४
येथील शंभर फुटी रस्ता परिसरातील हँग ऑन कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्यावर गुन्हा नोंद केला. विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली. दरम्यान, आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.
या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शहरातील कॅफे शॉपमधील अश्लिल प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली. आज संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 100 फुटी रोडवर असलेले एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी संशयित आशिषसमवेत तिची ओळख झाली होती. पीडित शिक्षणासाठी शहरातील वसतिगृहात राहते. एप्रिल २०२३ पासून पीडित शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करीत होता. पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तो सतत तिला मेसेज करीत होता. पीडितेने याला विरोध केला होता.
यावरून संशयित आशिष याने पीडितेस धमकावले होते. २२ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित आशिषने पीडितेस त्याच्या दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले. तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वत:च्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संशयित आशिष यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
कॅफे शॉपविरोधात आंदोलन
शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लिल चाळे करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले.