| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० मे २०२४
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्येही बदल केले जाणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ यावर्षी जून महिन्यात संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जुनमध्येच संपला होता. मात्र, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांना १ वर्ष मुदतवाढ दिली होती. भाजपच्या पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार सांभाळल्यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यामुळे आता अध्यक्ष बदलल्यावर पदाधिकारीही बदलले जातील.
भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव सर्वात पुढे आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अतिशय जवळचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही भूपेंद्र यादव यांच्यावर विश्वास आहे. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचेही नाव चर्चेत आहे. अमित शहा यांच्या विश्वासातील या नेत्याकडे लोकसभा निवडणुकीत महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. भाजपच्या नव्या अध्यक्षासाठी आता निवडणूक होणार नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. त्यानुसार संसदीय मंडळाला अध्यक्षांच्या नियुक्तीचे अधिकार मिळाले आहेत.