yuva MAharashtra राजकीय 'करिअर' घडवणारी आणि बिघडवणारीही महाराष्ट्रातली निवडणूक !

राजकीय 'करिअर' घडवणारी आणि बिघडवणारीही महाराष्ट्रातली निवडणूक !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
'राजकारणात कधीही कोणी संपत नसतं' हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं निरीक्षण आहे. संपण्याच्या, वा संपवण्याच्या, वल्गना कायम विरोधी बाजूंनी एकमेकांवर केल्या जातात. पण त्यात राजकीय अभिनिवेश वगळता फार काही तथ्य असतं असं नाही. असं असलं तरीही, काही निवडणुका या कारकीर्दी, घडवणा-या वा बिघडवणा-या असतात. त्यांच्या निकालांचा परिणाम पुढचा काही काळ या कारकीर्दींचं जे राजकारण असतं, त्याला एक तर उंचीवर नेऊन ठेवणारा असतो किंवा अगदी काही काळ मागे नेणारा. त्या निकालानं काहींची कारकीर्द झळाळून निघते, तर काहींची कारकीर्द झाकोळते.

शिखरावरचा असो वा पायथ्याचा, तो काळ किती लांबीचा असेल, कोणालाही भाकित वर्तवता येणं कठीण. 1977 च्या निवडणुकांनंतरच्या इंदिरा गांधींचं उदाहरण सतत समोर आहे. आणीबाणी नंतरच्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींना अशा पराभवाला सामोरं जावं लागलं की 'आता त्या संपल्या' अशी विधानं अनेकांनी केली. पण त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत बदललेल्या राजकीय स्थितीनं इंदिरांना पुन्हा सत्तेवर आणून बसवलं. बदलाचं वारं वाहत असतं, ते कधी एखाद्या व्यक्तीपाशी पोहोचतं, एवढाच प्रश्न असतो.

सध्या सुरू असलेली निवडणूक देशाची असली, तरीही महाराष्ट्रासाठी ती अशी अनेक वैयक्तिक कारकीर्दींसाठी निर्णायक ठरणारी झाली आहे. या निवडणुकीला सामोरं जाण्याअगोदर महाराष्ट्रात जे गेल्या पाच वर्षांत राजकारण घडलं, त्याची पार्श्वभूमी त्याला आहे. कधीकाळी अकल्पनीय वाटणा-या आघाड्या झाल्या, पक्ष फुटले, कुटुंब दुंभगली, निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी सहज निष्ठा बदलल्या, प्रदीर्घ न्यायालयीन लढाया झाल्या, पण न्याय झाला का याबद्दल शंका कायम राहिली आणि त्यात मतदारांचीही फाटफूट झाली. मतदारांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसतो आहे.

ही जी अशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, पूर्वीची प्रस्थापित राजकीय गणितं गावोगावी बदलली आहेत, त्यामुळे नेमकं भविष्यात काय घडेल हे सांगणं मुरलेल्या व्यक्तीलाही सांगणं अवघड आहे. पण ही निवडणूक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या कारकीर्दीतली टर्निंग पॉईंट ठरेल अशी स्थिती आहे. ज्या प्रकारची आव्हानात्मक स्थिती त्यांच्या व्यक्तिगत राजकीय कारकीर्दीत आली आहे, त्यावरुन ही निवडणूक त्यांच्यासाठी काही घडवणारी अथवा बिघडवणारी ठरु शकते. पण महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या कारकीर्दीतली ही निवडणूक टर्निंग पॉईंट ठरेल अशी स्थिती आहे. ज्या प्रकारची आव्हानात्मक स्थिती त्यांच्या व्यक्तिगत राजकीय कारकीर्दीत आली आहे, त्यावरुन ही निवडणूक त्यांच्यासाठी काही घडवणारी अथवा बिघडवणारी ठरु शकते.

एका निवडणुकीनं कायमस्वरुपी काही बदलत नसलं तरीही ही अशी निवडणूक आहे, ज्यात बरंच काही वैयक्तिक पातळीवरही पणाला लागलं आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सात महत्वाच्या नेत्यांसमोर या निवडणुकीतल्या यशापयशानं काय समोर वाढून ठेवलं आहे याचा अंदाज घेणं क्रमप्राप्त ठरतं.

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतली सर्वांत महत्वाची निवडणूक लढत आहेत. ठाकरेंसाठी ही निवडणूक अनेक गोष्टी सिद्ध करण्याची लढाई आहे. ज्या प्रकारे ते या निवडणुकीत उतरले आहेत, ते पाहता, त्यांनाही याची जाणीव आहे, हे दिसतं आहे.

जे शिवसेनेबाबत घडलं त्याबद्दल ठाकरेंना असलेली सहानुभूती जाणवणारी होती, पण केवळ तिथंच न थांबता त्यानंतर नव्या पक्षबांधणीपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत आणि नवे उमेदवार शोधण्यापासून ते 'इंडिया' आघाडीत जाईपर्यंत, उद्धव यांनी एका त्वरेनं पावलं उचलली. ही निवडणूक त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्यातून दिसलं.

उद्धव ठाकरे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतली सर्वांत महत्वाची निवडणूक लढत आहेत.
या निवडणुकीत त्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य, जणू सगळंच पणाला लागलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना त्यांच्याकडे सोपवणं हा इतिहासातला निर्णय योग्य होता, वर्तमानात आजही शिवसेना आणि शिवसैनिक त्यांच्या बाजूनं आहे आणि ते स्वत: आणि आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचं भविष्य आहे, हे त्यांना सिद्ध करुन दाखवायचं आहे.

न्यायालयाचा निर्णय बाजूनं लागलेला नसतांना, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल विरोधात गेला असतांना, निवडणुकांच्या मैदानात त्यांची बाजू ठाकरेंना सिद्ध करुन दाखवायची आहे.

आणि तेही पंतप्रधान मोदींपासून बूथपर्यंत असलेली भाजपाची यंत्रणा, महायुतीतले सगळे पक्ष, स्वत:च्याच पक्षातले विरोधात उभे असलेले एकेकाळचे स्वकीय हे सगळे समोर असतांना करुन दाखवायचं आहे.

ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा जणू एकहाती आपल्याकडे घेतल्याचं चित्र आहे. तेच विरोधकांचा मुख्य चेहरा आणि आवाज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते आहे, लोकांकडून प्रतिसाद येतो आहे.

या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना लढवत असलेल्या एकूण 21 जागांपैकी निम्म्या किंवा त्याहून अधिक जागांवर त्यांना यश मिळालं तर तो सद्य परिस्थितीत ठाकरेंसाठी मोठा विजय असेल. ते एक मोठं यश असेल आणि जे आरोप त्यांच्यावर 'शिवसेना न टिकवू ठेवण्या'चे होत आहेत, त्याला प्रत्युत्तर असेल.

ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा जणू एकहाती आपल्याकडे घेतल्याचं चित्र आहे.
कोणताही निकाल, ज्याला 'यश' म्हणून संबोधता येईल, तो जर उद्धव यांच्या वाट्याला आला, तर ज्या परिस्थितीत त्यांनी ते मिळवलं, ते पाहता, महाराष्ट्राच्या राजकारणातला ते नायक ठरतील. पण त्याउलट जर घडलं आणि अपेक्षित यश मिळालं नाही तर, जे आरोप त्यांच्यावर होत आहे, हिंदुत्व सोडल्यापासून ते शिवसेनेला चुकीच्या वाटेवर नेल्याचे, ते सगळे जनाधार सिद्ध न झाल्यानं, त्या बंडखोर आणि विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळेल. शिवसेना परत आपल्या ताब्यात पूर्णपणे घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही खिळ बसेल.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह नवा राजकीय डाव जो त्यांनी मांडला आहे तो कसा टिकाव धरु शकेल हा प्रश्न असेलच, पण त्यांच्या शिवसेनेसह आदित्य ठाकरेंच्या पुढच्या राजकीय भवितव्यासाठीही तो अडथळा असेल. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीसाठी निर्णायक आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कारकीर्दीतलाही ही निवडणूक टर्निंग पॉंईट ठरु शकते. कायम उद्धव ठाकरेंचे मुख्य सहकारी म्हणून वावरणाऱ्या शिंदेंनी नुसतंच बंड केलं नाही तर प्रत्यक्ष शिवसेनेवर दावाही केला. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष इथली लढाई शिंदे जिंकले असले तरीही शिवसेनेवरचा दावा तिथेच पूर्ण होत नाही.

शिवसेना हा मुख्यत: भावनेवर चालणारा पक्ष आहे. 'ठाकरे'हे कायम त्याच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळेच बहुसंख्य आमदार आणि खासदार आपल्यासोबत असले तरीही शिवसैनिकही आपल्यासोबत आहेत, हे शिंदेंना या निवडणुकीत सिद्ध करुन दाखवायचे आहे. त्यावरच त्यांच्या नजीकच्या भवितव्यातल्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कारकीर्दीतलाही ही निवडणूक टर्निंग पॉंईट ठरु शकते
शिंदेंना महायुतीच्या वाटाघाटीत काही जागा सोडाव्या लागल्या असल्या तरीही काही जागा त्यांनी शेवटपर्यंत नेटानं बोलणी चालू ठेवून पदरात पाडूनही घेतल्या. पण या जागांवर यश मिळवणं हे शिंदेंसाठी अनेक दृष्टिंनी आवश्यक आहे. आपण केवळ भाजपाच्या इशाऱ्यानं आणि पाठिंब्यावर अवलंबून नाही तर ठाकरेंसारखंच शिवसेनेचं नेतृत्वही करु शकतो हे याच निवडणुकीतून त्यांना सिद्ध करायचं आहे.

जो मार्ग राज ठाकरे वा नारायण राणेंनीही पत्करला नाही, तो शिवसेनेवर दावा सांगण्याचा मार्ग शिंदेंनी पत्करला, म्हणून ही निवडणूक त्यांच्या कारकीर्दीतली सर्वांत महत्त्वाची ठरते आहे. जर यश मिळालं, तर शिंदेंच्या बाजूनं शिवसैनिक आणि मतदारही आहे हे सिद्ध होईल. त्यांचं राजकारण केवळ ठाण्यापुरतं मर्यादित नसून ते राज्यभर राजकारण करु शकतात हेही दिसेल. त्यांच्या बरोबर बंड करुन बाहेर पडलेले आमदार, जे अधूनमधून नाराजी व्यक्त करत असतात, त्यांच्यावरही वचक येईल.

जर यश मिळालं, तर शिंदेंच्या बाजूनं शिवसैनिक आणि मतदारही आहे हे सिद्ध होईल. भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्येही शिंदेंच्या नेतृत्वाबद्दल स्पष्ट संदेश जाईल. सध्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांचा मुख्यमंत्री- पदावरचा दावा बळकट होईल. शिंदेंच्या झालेल्या प्रतिमेसाठी या निवडणुकीतलं यश अत्यावश्यक आहे, कारण त्या प्रतिमेवरच त्यांचं पुढचं राजकारण अवलंबून आहे. दुसरीकडे, जर त्यांना अपयश आलं, जास्त जागा जिंकता आल्या नाहीत, तर एका प्रकारे 'शिवसेना कोणाची' या प्रश्नाचं मतदारांच्या न्यायालयातलं ते उत्तर मानलं जाईल. शिंदेंच्या नेतृत्वावर त्यांच्यासोबत गेलेल्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊन अजूनही रोखून ठेवले गेलेले परतीचे मार्ग उघडले जातील. शिवाय भाजपाच्या, त्यातही केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत, शिंदेंचं महत्त्व किती हे ही निवडणूक ठरवेल. आवश्यक यश मिळालं नाही तर ते कमी होईल आणि विधानसभेसाठी नव्या पर्यायांचाही विचार सुरु होऊ शकतो. अजित पवार, देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांचं आव्हानंही शिंदेंसमोर मोठं होईल. एकंदरितच एकनाथ शिंदेंच्या कारकीर्दीसाठी ही निवडणूक एक महत्त्वाचं वळण आहे.

अजित पवार

एकनाथ शिंदेंनंतर सध्याच्या राजकारणात धक्कातंत्र वापरुन आपल्या राजकीय कारकीर्दीला वेगळं वळण दिलं आहे अजित पवारांनी. आपल्या काकांविरुद्ध बंड करुन त्यांनीही भाजपासोबत मैत्रीची वेगळी चूल मांडली. काहींचा पाठिंबा मिळाला, तर काहींचा रोष. त्यामुळेच आपला स्वतंत्र जाण्याचा निर्णय अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला आहे.

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्यासमोर बारामतीच्या निवडणुकीत विरोधात उभ्या राहिल्यानं कुटुंबातली नातीही पणाला लागली. शरद पवारांच्या विरोधात पहिल्यांदाच वेगळं जाऊन स्वतंत्र राजकीय चूल मांडणाऱ्या अजित पवारांचं राजकीय भविष्यही या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.

आपला स्वतंत्र जाण्याचा निर्णय अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला आहे.
शिंदेंसारखं या निवडणुकीच्या निकालानं हे सिद्ध होईलच की अजित पवारांचा बंडाचा, 'राष्ट्रवादी'वर दावा सांगण्याच्या निर्णयाला जनाधार आहे किंवा नाही. अजित पवार त्यांच्या चिन्हावर चारच जागा लढत आहेत, पण तिथंल यश निर्भेळ असेल तर 'राष्ट्रवादी'ची पुढची पिढी त्यांच्या बाजूला आहे असा संदेश जाईल. अजित पवारांची पक्षांतर्गत ताकदही नेमकी किती आहे ते समजेल. या जागांवर मिळालेल्या यशावर विधानसभेतलं भवितव्यही अवलंबून आहे. पण या थोडक्या जागांवरही अजित पवारांना अपयश आलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर होईल. शरद पवारांशिवाय त्यांचं अस्तित्व काय या विरोधकांच्या प्रश्नाला ते एका प्रकारे उत्तर असेल. अजित पवारांसोबत गेलेले आमदारही भविष्याच्या विचार करु लागतील.

मुख्य म्हणजे भाजपा नेतृत्वाच्या लेखी अजित पवाराचं महत्त्व किती राहील हे या निवडणुकीच्या यशापयशानं ठरेल. त्यावरुन महायुतीतलं त्यांचं स्थान, मुख्यमंत्रिपदावरचा दावा हे सगळंच अवलंबून आहे. त्यासाठीच त्यांचा राजकीय कारकीर्दीतला आजवरचा सर्वांत महत्वाचा निर्णय या निवडणुकीत पणाला लागलेला आहे.

देवेंद्र फडणवीस

भाजपाचा या निवडणुकीतला मुख्य चेहरा जरी नरेंद्र मोदी असले तरीही महाराष्ट्रात भाजपाची धुरा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांवरच आहे. केवळ भाजपाच नाही तर 'महायुती'ची जबाबदारी आणि त्यांचे सगळे उमेदवार निवडून आणण्याची रणनीति याच्या केंद्रस्थानी फडणवीसच आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या कारकीर्दीतही ही एक महत्त्वाची निवडणूक ठरु पाहते आहे.

फडणवीसांच्या कारकीर्दीतही ही एक महत्त्वाची निवडणूक ठरु पाहते आहे. देवेंद्र फडणवीस 2014 पासून महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा आहेत. पक्षातल्या इतर नेत्यांचं महत्त्व कमीजास्त होत राहिलं, ते आत बाहेर होत राहिले, पण मध्यवर्ती भूमिका फडणवीसांचीच राहिली आहे. त्यांच्या निर्णयांना दिल्लीचं समर्थनही राहिलं आहे. पक्ष विस्तारला, इतर पक्षातले मोठे नेते भाजपात आले, एकनाथ शिंदेंचं बंड होऊन नवं सरकार स्थापन झाला, या सगळ्यांत फडणवीसांची भूमिका महत्त्वाची होती. पण आता केंद्रात भाजपाला पुन्हा सत्ता आणायची असेल तर महाराष्ट्राचा हिस्सा मोठा असणं, 48 मधल्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या असणं, आवश्यक आहे. सध्याच्या आव्हानात्मक राजकीय स्थितीत ती जबाबदारी मुख्यत्वानं देवेंद्र फडणवीसांवर आहे. त्यामुळे राज्यातून मोदींसाठी जास्तीत जास्त किती खासदार निवडून आणले जातात यावर केंद्रातल्या सत्तेबरोबरच फडणवीसांची नजिकच्या भविष्यातली कारकीर्दही अवलंबून असेल.

मराठा आरक्षणाच्या अलिकडच्या आंदोलनात मनोज जरांगे असतील वा काही अन्य नेते, त्यांनी फडणवीसांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. या निवडणुकीत भाजपाला हवं तसं यश मिळालं, ते या टीकेला उत्तर ठरेल. पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपातलं त्यांचं मध्यवर्ती महत्त्व अधोरेखित होईल.

उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यावर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपामधला एकमेव पर्याय असतांना फडणवीसांना पाऊल मागे घ्यावं लागलं. उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. केंद्रात भाजपाला पुन्हा सत्ता आणायची असेल तर महाराष्ट्राचा हिस्सा मोठा असणं आवश्यक आहे.
पण या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं तर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सत्तेची सूत्र आपल्याकडे घेऊ शकते आणि तेव्हा फडणवीसच मुख्य असतील, अशी चर्चाही निवडणुकीच्या अगोदरपासून आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री म्हणून परत येण्यावर या निवडणुकीचा प्रभाव असू शकेल. मात्र जर भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही तर त्याची जबाबदारीही आहेच. महायुतीवरही त्याचा परिणाम होईल. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखे महायुतीतले मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असतील वा पक्षांतर्गत विरोधक, यांचं महत्त्व वाढेल.

फडवीसांकडे दिल्लीत जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्यामुळे ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीसाठीही महत्त्वाची ठरणारी आहे.

नारायण राणे

नारायण राणेंनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक निवडणुका लढवल्या, त्या संघर्षमयही झाल्या, जय-पराजय झाले पण ही निवडणूक त्यांच्या कारकीर्दीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे.

कोकणातल्या सिंधुदुर्गातून ते लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवत आहेत. त्यांचे पुत्र निलेश राणे इथून निवडूनही आले आणि नंतर पराभूतही झाले. पण विधानसभेला वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाल्यावर नारायण राणे परत कोकणातून निवडणुकीला उभे राहिले नव्हते. कोकणावरचं स्वत:चं वर्चस्व सिद्ध करण्याची राणेंची ही निवडणूक आहे. यावेळेसही चर्चा अशी होती की ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. पण भाजपानं आपली सगळी ताकद निवडणुकीत झोकायची ठरवली आणि त्यासाठी राणे हे मोठं नाव त्यांच्याकडे होतं.

एकेकाळी कोकणावर सगळीकडे प्रभाव असलेल्या राणे यांच्यासमोर, त्यांच्या नंतरच्या पिढीतले अनेक नेते आता सगळ्या पक्षातून तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणावरचं स्वत:चं वर्चस्व सिद्ध करण्याची राणेंची ही निवडणूक आहे. त्यातल्या यशापयशावरुन त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतल्या भविष्यातल्या गोष्टीही ठरतील. ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात असतील का, भाजपाच्या राजकारणा ते कुठे असतील, तळकोकणात ताकद कोणाची असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निकालातून मिळतील.

उदयनराजे भोसले

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी यंदाची इथली लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कारकीर्दीतला निर्णायक ठरणारी आहे. उदयनराजेंनी मोठ्या प्रयासानं भाजपाचं तिकिट खेचून आणलं. त्यासाठी त्यांना बरीच वाट पाहावी लागली.

उदयनराजेंनी मोठ्या प्रयासानं भाजपाचं तिकिट खेचून आणलं. पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर उदयनराजेंना साताऱ्यात किती जनाधार आहे असा प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर या निवडणुकीतून मिळू शकतं. खासदार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांची कारकीर्द मोठी झाली. अगोदर पूर्वी ते भाजपाच्या जवळही गेले होते. पण आता या निवडणुकीत यश मिळालं तर त्यांचा पराभव अपवाद होता असं म्हणता येईल, पण अपयश आलं तर त्यांची राजकीय कारकीर्द कशी असेल हा प्रश्नच आहे. पण जिद्दीनं तिकिट मिळवून उदयनराजेंनी साताऱ्यात आपलं राजकीय वजन पणाला लावलं आहे.

पंकजा मुंडे

परळीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपाच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून बाहेर गेल्या होत्या. त्याअगोदर मंत्रिमंडळात असतांना त्यांची घुसमुट होतच होती. पण पराभवानंतर पंकजा यांनी मोठा काळ वाट पाहत काढला. विधानपरिषद, राज्यसभा अशा अनेक निवडणुका येऊन गेल्या. पण त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांना त्यांच्या बहिणीच्या जागी तिकिट देण्यात आलं, तेही बीड मतदारसंघातून जिथून कधी त्यांचे वडील गोपिनाथ मुंडे खासदार होते. त्यामुळे पंकजा यांच्यासाठी हे होम पिच आहे. पण तरीही ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हान बनली आहे आणि त्यांच्या कारकीर्दीसाठी निर्णायक ठरु शकते.

पराभवानंतर पंकजा यांनी मोठा काळ वाट पाहत काढला. या निवडणुकीतलं यश पंकजा यांना पुन्हा मुख्य प्रवाहात घेऊन येईल. महाराष्ट्रातलं ओबीसी राजकारण आज ज्या टप्प्यात आहे, त्यासाठी पण ते महत्त्वाचं असेल. खासदार होऊन दिल्लीची जबाबदारी मिळाली तर पुन्हा त्या नव्यानं काही सिद्ध करुन शकतील. पण जर अपयश पदरी आलं तर आलं पुन्हा संघर्ष करावा लागेल. पुढची संधी कधी आणि कशी असेल हे सध्याच्या राजकीय स्थितीवरुन सांगता येत नाही.

ही निवडणूक त्यांच्यासाठी कौटुंबिक पातळीवरही महत्त्वाची आहे कारण स्वत:च्या बहिणीच्या जागेवरच त्यांना हे तिकिट मिळालं आहे आणि दुसरं म्हणजे, एकेकाळी राजकीय विरोधक बनलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख आहेत. त्यामुळे या निवडणुकीतलं यशापयश मुंडे कुटुंबियांच्या बीडमधल्या राजकीय भवितव्यावरही परिणाम करणार आहे. एकंदरीतच 2024 ची लोकसभा निवडणूक देशाचं भविष्यातलं सरकार ठरवणार आहे, पण महाराष्ट्रात मात्र काही राजकीय कारकीर्दींवर ती दीर्घकालीन परिणाम करणारी ठरते आहे.