| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२४
दोन दिवस जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दि. २१, २२ मेपर्यंत सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या पावसाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाऊस कमी आणि वादळी वारेच जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दि. २१ आणि २२ वादळी पाऊस असला तरी दि. २३ मे रोजी आकाश स्वच्छ असणार आहे. यादरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या दरम्यान, नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे, अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे.