| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ मे २०२४
भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एबल 2108 या दीर्घिका समूहात तब्बल 20 लाख प्रकाशवर्षे अंतरात पसरलेल्या दुर्मीळ रेडिओ स्रोताचा शोध लावला आहे. अद्ययावत केलेल्या जायंट मीरवेव्ह रेडीओ टेलिस्कोपच्या सहाय्याने हे संशोधन करण्यात आले.
येत्या काळात दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीच्या घटनाक्रमाचा अभ्यास करण्यासाठी हा शोध फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने याबाबतची माहिती दिली.
इंदूरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखालील या संशोधनामध्ये आयआयटी इंदूरचे अभिरूप दत्ता, नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी तैवानचे माजिदुल रहमान, एनसीआरए पुणेच्या रुता काळे आणि मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे सुरजित पॉल यांचा समावेश होता.
या खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा शोधनिबंध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला.