yuva MAharashtra संतोष कदम खूनप्रकरण : संशयितांच्या अटकेसाठी सांगली पोलिसांना आदेश

संतोष कदम खूनप्रकरण : संशयितांच्या अटकेसाठी सांगली पोलिसांना आदेश



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ मे २०२४
कुरुंदवाड येथील नांदणी रस्त्यावर सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खूनप्रकरणातील फरारी संशयित आरोपी सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख हे दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांना अटक करण्याचे लेखी आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला आहे. दोघा संशयितांच्या अटकेसाठी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेशनला पत्र मिळाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

या खूनप्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित नीतेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे आणि फरारी सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख या पाचजणांविरुद्ध तपासी अधिकारी इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नांदणी रस्त्यावर कोप्पे यांच्या शेताजवळ सांगली येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून ७ फेब्रुवारी रोजी झाला होता. संतोषवर यापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. तो पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचला होता.हल्लेखोरावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तो मागे घेण्यासाठी संतोषला वारंवार धमक्या सुद्धा येत होत्या. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक असलेल्या पैलवानाचा समावेश होता, असे प्रफुल्ल कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संतोष कदमवर पुन्हा हल्ला झाला. कदम कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस कार्यालयकडे वारंवार माजी नगरसेवकांस अटक करण्याची मागणी केली. तक्रारीमध्ये माजी नगरसेवकाचे नाव जरी दिले असले तरी त्यास पुरावाच नसल्याने अटक झालेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

संशयित चिपरीकर याच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार

संशयित चिपरीकर याच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. या खुनाचा तपास पोलिसांनी गतिमान करून तिघांना अटक केली. त्यानंतर सिद्धार्थ चिप्रीकर व शाहरुख शेख या दोघांची नावे निष्पन्न झाली. या दोघांनी जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती. यामध्ये सिद्धार्थ चीप्रिकर याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून शेखच्या जामीन अर्जावर सुनावणी चालू आहे.

पाेलिसांसमाेर तपासाचे आव्‍हान

खून झालेला कदम आणि आरोपी हे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शोधाचे कोल्हापूर पोलिसांच्या समोर एक आवाहन निर्माण झाले आहे. संशयित आरोपींना जेरबंद करण्यात यश आले नाही.तीन महिने उलटले तपासी अधिकारी उपअधीक्षक साळवे यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.एक महिन्यांपूर्वीच कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली पोलिसांची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास तपास अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले आहे. अटकेची पोलीस यंत्रणा गतीमान झाली आहे.

कदम खून प्रकरणी संशयित पाच जणांविरुद्ध जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मयत कदम आणि मुख्य आरोपी यांचा एकमेकांशी संपर्क आला आहे. कदम याचा खून करण्यामागचे नेमके कारण काय हे त्यांना अटक झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतर ॲट्रॉसिटीच्या कलमांची वाढ करण्यात येणार आहे.

संताेष कदम खून प्रकरण घटनाक्रम

८ फेब्रुवारीला संतोष कदमचा खून.
10 फेब्रुवारीला कदम खुनातील 3 आरोपींना अटक.
14 फेब्रुवारीला मुख्य संशयित म्हणून चिपरीकर-शेख यांची नावे निष्पन्न.
13 फेब्रुवारीला माजी नगरसेवक चव्हाण, गोंधळी यांची चौकशी.
28 मार्चला सांगली येथील 6 जणांची चौकशी
6मे रोजी जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
8मे ला फरारी संशयितांच्या अटकेसाठी महानिरीक्षकांचे सांगली पोलिसांना लेखी आदेश.
आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक.